सांगलीत करोनाचा पहिला बळी

मृताच्या संपर्कातील २७ जण क्वारंटाईन; सांगली, मिरज शहरे सील

सांगली (प्रतिनिधी) : सांगलीतील विजयनगरमधील एका बॅक कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला अत्यवस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मिरज करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु रविवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

सांगलीत करोनाने शिरकाव केल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती. इस्लामपूर येथील करोना रुग्णांनी करोनावर मात केली होती. परंतु सांगलीत करोनाने शिरकाव करताच पहिला बळी घेतला आहे.  संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंब, बँक कर्मचारी तसेच परिसरात राहणारे नागरिक असे एकूण २७ जणांना ताब्यात घेवून त्यांचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.

इस्लामपूरनंतर सांगली शहरात करोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला सर्दी, ताप आणि घशात दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते. परंतु त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने दि. १७ रोजी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार करून देखील त्यांचा बरे वाटत नसल्याने त्यांच्या घशातील व नाकातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.  रविवारी सकाळी ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. दिवसभर त्यांची प्रकृती गंभीर होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, संबंधित करोना बाधित व्यक्तीच्या घरातील पाच जणांना मिरज करोना सेंटरमधील आसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या बँकेतील 11 कर्मचार्‍यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान ते सांगलीतील बँकेत काम करीत  असलेला परिसर देखील सील करण्यात आला आहे. रविवारी सकाळी संपूर्ण बँकेवर सॅनिटायझर फवारण्यात आले.

विजयनगर सील…

करोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली आणि मिरज ही दोन्ही शहरे पूर्णपणे सील करण्यात आले होते. दोन्ही शहरांना जोडणारा मुख्य रस्ता खुला ठेवण्यात आला होता. परंतु या रस्त्यावरील विजयनगर येथे करोनाबाधित रुग्ण सापडल्याने विजयनगर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. तसेच सांगली-मिरज रस्ता देखील सील करण्यात आला आहे.

वाराणसीहून आलेले 28 जण निगेटिव्ह…

वाराणसीमधून मिरजेत आलेले सर्व 28 गलाई कामगारांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिरजेतील सर्वजण उत्तरप्रदेश येथील वाराणसी येथे गलाईचा व्यवसाय करीत होते. लॉकडाउन वाढल्याने ते वाराणासी येथील प्रशासनाची परवानगी घेवून मिरजेत आले होते. मिरजेत आल्यानंतर या सर्वांचे संस्था क्वारंटाईन करण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ते नमुने निगेटिव्ह आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.