वारजे (एकता जाधव)- वारजे येथील भंगारच्या गोदामाला नुकतीच लागलेली मोठी आग तसेच उत्तमनगरमध्ये कोपरे भागात थिनरच्या साठ्याला लागलेली आग या घटनांतून या परिसरातील अग्निशमन केंद्राचा मुद्दा समोर आला आहे. विशेष म्हणजे केंद्रांची संख्या वाढविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असताना वारजे-कर्वेनगर भागातील अग्निशमन केंद्रात 2011-12 पासून नवीन कर्मचारी भरती प्रक्रियाच झालेली नाही.
वारजे-कर्वेनगर भागामध्ये बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. आजारपण आणि मृत्यू, अन्य खात्यामध्ये बदली, कर्मचाऱ्यांची बढती यातून कर्मचारी संख्येतील पोकळी वाढत गेली आहे. यातून मनुष्यबळाचा अभाव असून अतिरिक्त कामाचा ताण चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. यामुळे चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ताण व रोष दिसून येत आहे.
अग्निशमन दल हे महानगरपालिकेच्या अति महत्त्वाच्या विभागामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत येते. या दलामध्ये कोणतेही पद तीन महिन्यांपेक्षा जास्त रिक्त असू नये, हा नियम असताना देखील कर्वेनगर भागामध्ये जेथे एका अग्निशमन केंद्रावर नऊ ते दहा कर्मचारी आवश्यक आहे, त्या ठिकाणी आज 4 कर्मचारी कार्यरत आहेत. एखादा कर्मचारी रजेवर असेल तर एकजण व्यवस्थापन, एकजण फोनवर आणि एकच जण अग्निशमन गाडीवर असतो, अशा वेळी आगीच दुर्घटना घडल्यास सर्वांचीच तारांबळ उडते, हे वास्तव आहे.
कर्वेनगर मधील अग्निशमन केंद्रातील एका कर्मचाऱ्यांनी सांगितले की, कर्मचरी संख्या कमी असल्याने रजा मिळत नाहीत. साप्ताहिक सुट्ट्याच कशाबशा मिळतात. यातून कामाचा ताण आणि त्यातून कौटुंबातील ताणवा वाढत आहे. प्रत्येक जण कुटुंबासाठीच काम करत असताना स्वतःच्या कुटुंबालाच वेळ देता येत नसल्याची स्थित आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने स्टेशन ऑफिसर रजा देत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर न झाल्याने वाद होऊन अतिरिक्त कामातून ताणतणाव वाढत आहे. यातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.
– गजानन पाथरूडकर, कर्वेनगर स्टेशन ऑफिसर
“पीएमआरडीए’ने तयार केलेल्या विकास प्रारूप आराखड्यानुसार नवीन 23 गावांचा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याच्या क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने जो आराखडा आहे, त्यानुसार एकूण 72 अग्निशमन केंद्रांची आवश्यकता आहे. या नवीन आराखड्यानुसार शहर-उपनगरांत अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज असून शासकीय पातळीवर तसे प्रयत्न करीत आहोत.
– प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन अधिकारी
शहर-उपनगरांत सद्यस्थितीमध्ये 14 केंद्र कार्यान्वित आहेत. चांदणी चौक, कोथरूड येथील बांधकाम सुरू आहे. इतर केंद्रांसाठी शासनाकडे पाठपुरावा आम्ही करीत आहोत. या विषयाची सगळी माहिती मला मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांकडून येते. मी या बाबतीत मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येतील.
– रवींद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त,
पुणे महानगरपालिका