नवी दिल्ली: जगभरात करोनाच्या नव्या व्हेरिएंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता हातपाय पसारण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारच्या सिव्हिल एव्हिएशनने काढलेल्या ताज्या आदेशानुसार, आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांना स्थगिती देत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर एका देशातून दुसऱ्या देशात हा व्हेरिएंट पसरू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित कऱण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
नव्या निर्णयानुसार आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित ठेवली जाणार आहे. त्यानंतर करोनाची जागतिक परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. केंद्र सरकारनं तातडीचा हा आदेश काढल्यामुळे भारतात येणाऱ्या आणि भारतातून परदेशात जाण्याचा प्लॅन करणाऱ्यांना आता त्यांचे नियोजन बदलावे लागणार आहे.
प्रवासी विमानसेवेसाठी केंद्र सरकारने काढलेला हा नवा आदेश लागू असला तरी कार्गो सेवा मात्र पूर्ववत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे काही खास विमानफेऱ्यांना परवानगी देण्यात येऊ शकते, असे या आदेशात म्हटले आहे. मात्र त्यासाठी DGCA ची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे.
ज्या विमानांच्या फेऱ्यांचे अगोदरच बुकिंग झाले आहे, त्यांना विशिष्ट अटीवर प्रवासाची परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र ही परवानगी सरसकट सर्व फेऱ्यांसाठी नसून प्रत्येक फेरीबाबत स्वतंत्रपणे निकष तपासून निर्णय घेतला जाणार आहे.