पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बुधवार पेठेतील भाऊ रंगारी गणपती जवळील देवरुखकर वाड्याला मंगळवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने दोन फायर गाड्या आणि तीन टँकरच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. या दुमजली वाड्यात विविध प्रकारचे चषक (ट्रॉफी) तयार करण्याचे काम सुरू होते.
वाड्याला दुपारी पावणे दोनच्या सुमारास आग लागली. या वाड्यात सध्या कोणी वास्तव्यास नव्हते. मात्र, तेथे ट्रॉफी बनविण्याचे साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. या साहित्याने पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.
अग्निशमन दलाच्या दहा अधिकारी आणि ४० जवानांनी आग आटोक्यात आणली. मध्यवस्तीत वाड असल्याने तसेच वाहन जाण्यास जागा नसल्याने जवानांन मोठी कसरत करावी लागली. आग नियंत्रणात आणल्यानंतर कुलिंगचे काम करण्यात आले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.