लोणी काळभोर(प्रतिनिधी) – पेट्रोलियम पदार्थ वाहतुक करणाऱ्या टॅंकरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने टॅंकरने पेट घेतला. चालकाने समयसुचकता दाखवून तो महामार्गावरून बाजूला घेतल्याने मोठी दुर्घटना टाळली.
यामध्ये क्लीनरला भाजले असून टॅंकरच्या कॅबीनचे मोठे नुकसान झाले आहे. टॅंकर (एमएच 12 एलटी 8600) यावरील चालक विष्णू आंबेकर (रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली. मूळ रा. बीड जिल्हा) हे पुणे येथील लडकत सर्व्हिस स्टेशन येथे टॅंकर खाली करून पुन्हा भरण्यासाठी लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम टर्मिनलकडे निघाले होते.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका येथे टॅंकरने अचानक पेट घेतला. यामध्ये क्लीनर तुळशीराम कवटे (वय 23, रा. कदमवाकवस्ती) यांच्या डाव्या हाताला भाजले. त्याला उपचारासाठी तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.