पुणे : शहरातील सर्वाधिक उच्चभ्रू भाग समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरातील महापालिकेच्या अधिकाऱ्यांची राहूल सोसायटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मंगळवारी दुपारी दोन मुली एका फ्लॅट मध्ये आल्या होत्या. त्यातील एका मुलीचा प्रियकर या सोसायटीत येऊन त्याने आपल्या प्रेयसिला सोसायटीच्या आवारातच मारहाण केली. त्यामुळे सोसायटीत मोठा गोंधळ उडाला.या गोंधळानंतर ही माहिती पोलिसांना मिळताच पोलीस दाखल झाले. मात्र, त्यानंतर या दोघांना समज देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, असे प्रकार वारंवार घडत असून बाहेरील मुली तसेच व्यक्तींचे सोसायटीत वारंवार येणे जाणे असल्याचे सोसायटीतील काही सदस्यांकडून खासगीत सांगण्यात येत आहे. त्यामुळे, उच्चभ्रू भागात असलेली ही सोसायटी चर्चेचा विषय ठरत आहे. तर अनेक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घर घेऊन ती भाडेकराराने दिलेली आहेत. त्यामुळे त्याचा गैरवापर सुरू असल्याचेही खासगीत बोलले जात आहे.
या घटनेबाबत सोसायटीमधील काही सदस्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी दोन मुली सोसायटीमध्ये आल्या. त्यांनी एका फ्लॅट मध्ये जायचे म्हणून रजिस्टर मध्ये नोंद केले. त्यानंतर या मुली आत गेल्या. काही वेळाने या मुलींबाबत विचारणा करत एक इसम सोसायटीत आला त्याने, या मुली कुठे गेल्या अशी विचारणी केली. तसेच रजिस्टर पाहिले, मात्र, रजिस्टर मध्ये नोंदणी असलेल्या घरा ऐवजी त्या दुसऱ्याच घरात असल्याचे दिसून आले. त्यानंतर या इसमाने या ठिकाणीच आपल्या मैत्रीणीला मारहाण केली. त्यानंतर पोलीसही आले. मात्र,हा घरगुती वाद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महापालिकेच्या या सोसायटीत अधिकाऱ्यांची घरे आहेत. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी ती भाडेकराराने दिलेली आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी थेट घरांमध्येच बदल करत अतिक्रमण केले आहे. या शिवाय या सोसायटीचे टेरेसही परवानगी नसताना बेकायदेशीरपने बंद करण्यात आले. त्याच वेळी, स्वत: अधिकारी राहत नसतानाही यातील अनेक प्लॅटला मालक राहत नसतानाही शासनाने रद्द केलेली 40 टक्के कर सवलत अद्यापही दिली जात आहे. त्यामुळे या सोसायटीत अनेक नियमांचे उल्लंघन असतानाही केवळ महापालिका अधिकाऱ्यांची सोसायटी असल्याने अतिक्रमण विभाग तसेच बांधकाम विभागही त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. त्यातच, अशा प्रकारांमुळे सोसायटीचे नाव खराब होत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे. तर आपलेच दात आणि आपलोच ओढ म्हणून बोलणार कसे अशी भूमिका अधिकारीही गप्प आहेत.
——————-