तरुणांना आकर्षण : काळानुरुप “हेअर स्टाइल’चा ट्रेंडही बदलतोय
शिंदे कुटुंबीयांच्या पारंपरिक व्यवसायाला नवा लूक
इंदोरी – कोण कधी आणि कशाचा शोध लावेल, सांगता येत नाही. हल्ली सोशल मीडियावर “फायर हेअरकट’चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लंडनमधील एका सलूनने असा फायर हेअरकटचा व्हिडीओ पहिल्यांदा नेटवर टाकला. आता मुबंईतील सलूनने त्याचीच री ओढली असताना तळेगाव स्टेशन येथील जी-स्पिरिट सलूनने फायर हेअरकटचा वाढता “ट्रेण्ड’ लक्षात घेत थेट अशी सेवा सुरू केली आहे.
तळेगाव स्टेशन येथील बॅलाडोर कॉम्प्लेक्स! रेल्वे स्टेशनपासून दीड एक किलोमीटर अंतरावर. या इमारतीत 22 वर्षीय गौरव शिंदे याने सजवलेय त्याचे “जी-स्पिरिट’ सलून शिंदे कुटुंबाचा हा गेल्या पाच पिढ्यांचा पारंपरिक व्यवसाय तो नेटाने पुढे नेतोय. काळ बदलला तसा “हेअर स्टाईल’चा “ट्रेण्ड’ही बदलत गेला.
गौरवचे आजोबा वसंतराव 1940 ते 1990 च्या काळातील केशकर्तनकार पण ते शीघ्र कवी म्हणूनही तळेगाव परिसरात नावाजलेले कलाकार होते. गौरवचे वडील चंद्रशेखर यांनी सलूनचा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. सोशल मीडियाचा बोलबाला जसजसा वाढत गेला आणि यू-ट्यूब वरील व्हिडीओने तो व्यापला तसा “फॅशन ट्रेड’ने जगभरात धूम ठोकली. बस हाच धागा धरून गौरवने आपल्या समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला नवा लूक दिल्याचे दिसून येत आहे.
फायर कट म्हणजे नक्की आहे काय?
हॉटस्पॉट म्हणजे “फायर हेअर स्टाइल’चा फायर कट सध्या मोठा आकर्षणाचा ट्रेण्ड होत आहे. डोक्यावरचे केस मागे वळवायचे, त्यावर कुलकूल लिक्विड पसरावायचे आणि मग ओल्या केसांवर आग लावायची. अरे बापरे, पण काळजी करू नका, साधा चटकाही नाही बसणार आणि मृत झालेले केस गायब होतात.
“फायर हेअर स्टाइल’चा कोणी घरी संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय वापर करू नये. आतापर्यंत आम्ही केलेल्या एकही ग्राहकाची याबद्दल तक्रारीची नोंद झालेली नाही. मावळ ग्रामीण परिसरातील तरुण देखील “फायर हेअर स्टाइल’ला पसंती देत आहेत.
– गौरव शिंदे, कारागीर.