शिराळा – शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून “विश्वास’ ने सहकारात वेगळी वाट निर्माण केली आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे आयुष्याची शंभरी पार केलेले सभासद हिंदुराव गायकवाड यांनी केले.
चिखली, ता. शिराळा येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात काटा पूजन आमदार मानसिंराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कारखान्याचे सचिव सचिन पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, अधीक्षक संभाजी पाटील, खरेदी व भांडार प्रमुख राजेंद्र पाटील, मुख्य अभियंता दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
गायकवाड म्हणाले, स्थापनेपासून मी कारखान्याचा सभासद आहे. येथील कामागारांच्या सोसायटीत सचिव म्हणून मी सेवा केली आहे. स्वातंत्र्य सैनिक आनंदराव नाईक, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत काम केले आहे. त्यांनी लोकहित व समाजसेवेचा वसा व वारसा जोपासला. शेती व शेतकरी हिताचे निर्णय घेतले. पाणी योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले.
शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील सर्वसामान्यांचे जिवनमान उंचावण्याचा सातत्याने प्रयत्न करून सहकाराची निकोप वाढ केली. त्याच पध्दतीने अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी त्याचा वारसा पुढे चालवला आहे. विश्वासराव नाईक कारखान्यात विविध संस्थांची उभारणी करून त्याचा उद्योग समूह बनवला आहे. शेतकऱ्यांना अनेक सोयीसुविधा पुरवल्या आहेत. आता विश्वास हा उसाला हमखास हमीभाव देणारा व पैसे मिळण्याची हमखास खात्री असणारा महाराष्ट्रातील एक अग्रगन्य कारखाना आहे.
प्रारंभी कार्यकारी संचालक राम पाटील प्रास्ताविकात म्हणाले, कारखान्यास केंद्र व राज्य शासनाकडून गाळप परवाना मिळाला आहे. या हंगामात शिराळा तालुक्यात वारणा व शाहूवाडी तालुक्यात कडवी नदीकाठावरील ऊस क्षेत्राची मोठी हाणी झाली आहे. त्यामुळे गाळपात अडचणी येणार आहेत. तरीही कारखाना नियोजन पूर्वक वेळेत गाळपाचे अपेक्षित लक्ष्य गाठेल. शासनाच्या निकषाप्रमाणे गाळप करुन व इतर निकष पाळले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास मुख्य लेखापाल भानुदास पाटील, आसवणी प्रकल्प अधिकारी युवराज गायकवाड, मिश्रक ए. एस. पाटील, गाडीतळ निरीक्षक विजय देसाई, जल अभियंता दिनकर महिंद, मुख्य शेती अधिकारी विठ्ठल चव्हाण, संगणक अधिकारी प्रकाश पाटील, पर्यावरण अधिकारी शरद पाटील, आनंदराव गायकवाड, हिंमत पाटील, हौसेराव गायकवाड, हणमंत गायकवाड, हरी कुंभार, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.