पिंपरी, (प्रतिनिधी) – युवा युवतींनी राजकारणामध्ये यावे. तसेच मुलींनी स्वसंरक्षणार्थ सक्षम व्हावे. विविध क्षेत्रात उपलब्ध संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी आधुनिकरणाला सुद्धा सामोरे जावे. त्याकरिता संघटनेच्या वतीने विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देखील देण्यात येणार असून, सशक्त भारत निर्माण करण्यासाठीयोगदान द्यावे, असे आवाहन दुर्गा ब्रिगेड अध्यक्ष दुर्गा भोर यांनी केले.
दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य तर्फे युवा संवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मोठ्या संख्येने युवक- युवती उपस्थित होते.
यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी युवकांना स्टार्टअप उद्योग याविषयी मार्गदर्शन केले. अनेक युवकांना शिक्षण घेत स्वतःचे छोटे व्यवसाय करून शिक्षणाचा खर्च देखील भागविता येऊ शकतो. याकरिता संघटनेची कायम सहकार्याची भूमिका असेल, अशी ग्वाही यावेळी दिली.या युवा संवादमध्ये युवकांशी निगडीत विविध विषयांवर उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.
अनेक जण आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहेत. पर जिल्ह्यातून व राज्यातून आलेल्या विद्यार्थिनींना राहण्यासाठी शासकीय वसतीगृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांचे त्रास आणि सुरक्षा ही जपली जाईल अशा भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. सुनिता चौधरी, डॉ.श्याम सोनवणे, डॉ. यशवंत महाजन, रोशन मराठे यांनी मार्गदर्शन केले.