“ब्रेक डाऊन’चे शुक्‍लकाष्ट संपवा

“पीएमपी’ प्रशासनाला निवेदन ः इंद्रायणीनगरमध्ये बस बंद

भोसरी  – इंद्रायणीनगरमध्ये पीएमपीची बस बंद पडून प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. नादुरुस्त बस पिंपरी-चिंचवडकरांच्या माथी मारण्याच्या धोरणामुळे “ब्रेक डाऊन’चे शुक्‍लकाष्ट कायम असल्याचा आरोप महापालिकेच्या शहर सुधारणा समितीचे सदस्य संजय वाबळे यांनी केला आहे.

इंद्रायणीनगर-कात्रज बसचे “ब्रेक डाऊन’ झाल्यामुळे प्रवाशांना भर रस्त्यात उतरुन दुसरी बस पकडण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली. काल (मंगळवारी) ही घटना घडली होती. याबाबत काही प्रवाशांनी संजय वाबळे यांच्याकडे संताप व्यक्त केला. त्यानुसार, वाबळे यांनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका नयना गुंडे यांना निवेदन देत पीएमपी सेवेच्या तक्रारींचा पाढा वाचला.

निवेदनात नमूद आहे की, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य नागरिक दैनंदिन प्रवासासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या बसेसचा वापर करतात. परंतु, मागील काही महिन्यांपासून सदोष बससेवेमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. वेळेवर देखभाल व दुरुस्ती न केल्याने विविध मार्गावरील बसेस “ब्रेक डाऊन’मुळे अचानक रस्त्यात वारंवार बंद पडतानाचे चित्र पाहावयास मिळते. अनेक बसेचच्या काचा फुटल्या आहेत. दरवाजे खराब झाले आहेत.

विविध कारणांनी नादुरुस्त व खिळखिळ्या अवस्थेत बहुसंख्य बस असल्याचे निदर्शनास येते. पावसाळ्यात अनेक बसेसचे छत गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे बसमधील प्रवासी पावसाच्या पाण्याने भिजतात. या सर्व गोष्टींचा नाहक त्रास विद्यार्थी, महिला, कामगार, ज्येष्ठ नागरिक व पर्यटक यांना होत आहे. तसेच 10 वर्षांपेक्षा अधिक काळ वापरात असलेल्या बस मार्गावर धावत असल्याने अपघात होण्याची शक्‍यता नाकारत येत नाही. ही बाब प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे महापालिकेने नादुरुस्त जुन्या बसेसचा वापर बंद करावा, अशी मागणी संजय वाबळे यांनी केली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)