वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 15 लाखांची पुस्तक खरेदी

पिंपरी  – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत औषध वैद्यकशास्त्र आणि शल्यचिकित्सा या विषयांची एकूण 451 पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 15 लाख रूपये खर्च होणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने आज मान्यता दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. एकूण 15 विषयांपैकी प्रथम 10 विषयांमध्ये मेडिसीन किंवा जनरल मेडिसीन, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, कान-नाक-घसा, अस्थिरोग, बालरोग, शल्य, सर्जरी, क्ष-किरण, मानसोपचार शास्त्र, भुलशास्त्र, पॅथोलॉजी हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

या अभ्यासक्रमांअंतर्गत पदव्युत्तर शिक्षण संस्थेला औषध वैद्यक शास्त्र आणि शल्यचिकीत्सा या विषयांची एकूण 451 पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये औषध वैद्यक शास्त्र विषयाची 176 आणि शल्यचिकित्सा विषयाची 275 पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी वायसीएम रूग्णालयाने पुस्तके खरेदी करून मिळण्याची मागणी केली आहे.

मागणी केलेल्या पुस्तकांसाठी बी. जे. मेडीकल को-ऑपरेटीव्ह कन्झुमर स्टोअर यांनी 14 लाख 99 हजार रूपयांचे दरपत्रक सादर केले आहे. त्यामध्ये औषध वैद्यक शास्त्र विषयाच्या 176 पुस्तकासाठी 3 लाख 94 हजार रूपये आणि शल्यचिकित्सा विषयाच्या 275 पुस्तकांसाठी 11 लाख 5 हजार रूपये दर सादर केला आहे. त्यांनी संबंधित पुस्तकाच्या मूळ खरेदी किमतींवर 20 टक्के ते 55 टक्‍क्‍यांपर्यंत सूट दिली आहे. ही पुस्तके खरेदी करणे आवश्‍यक असल्याने निविदा न मागविता थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)