प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 -करोना काळात बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याऐवजी या गाड्यांवरच रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेसची झूल चढविली आहे. यामुळे प्रवाशांना तिकीट दर जास्त मोजावा लागत असून, रोज शहरात ये-जा करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. पॅसेंजर गाड्या तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
करोना काळात रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे वाहतूक बंद केली होती. विषाणूचा प्रादुर्भाव कमी होताच रेल्वे प्रशासनाकडून सेवा पुर्ववत करण्यात आली. पण अजूनही सर्वसामान्यांना परवडणारी पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली नसल्यामुळे जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. पुणे शहरात सर्व शासकीय मुख्यालये असल्यामुळे उपनगर आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच ग्रामीण भागातील बरेच शेतकरी मार्केट यार्डात शेतमाल विक्रीसाठी, थकलेली बिले घेण्यासाठी, खासगी कंपन्यामध्ये कामाला आणि इतर कामानिमित्त येत असतात. ग्रामीण भागातील सर्वच स्थानकांवर एक्स्प्रेस गाड्या थांबत नाहीत.
रेल्वे प्रशासनाने काही मार्गावरील पॅसेंजर बंद करून या मार्गावर डेमू सेवा सुरू केली. तर काही मार्गांवरील गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. पॅसेंजरऐवजी डेमू आणि एक्स्प्रेस गाड्या प्रशासनाने सुरू तर केल्या; पण या गाड्यांच्या तिकीट दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागत आहे. पुणे-दौंड आणि पुणे-बारामती मार्गावर पूर्वी पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. त्यात आता बदल करून डेमूचा दर्जा दिला आहे. तर पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडीला एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. या दोन्ही मार्गावरील गाडीच्या दर्जात बदल केला असल्यामुळे तिकीट दरात वाढ झाली आहे; पण पूर्वीइतकाच वेळ लागत आहे.
काही मार्गावर डेमू सुरू केल्या आहेत; पण पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय बोर्डाकडून घेतला जातो, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
पॅसेंजर गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा देऊन प्रवाशांची आर्थिक लूट केली जात आहे. करोनापूर्वी सुरू असलेल्या पॅसेंजर पुन्हा सुरू कराव्यात. तसेच पुणे-दौंड आणि पुणे-सातारा मार्गाला उपगनगरीय वाहतुकीचा दर्जा द्यावा.
– हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी मंच
तिकीट दरपूर्वीआता
पुणे-दौंड2045
बंद असलेल्या पॅसेंजर
57516-पुणे-मनपाड-नांदेड
51422-पुणे-निजामाबाद-नांदेड
51402-पुणे-दौंड-मनमाड
51034-सीएसटी-पुणे-शिर्डी
51442- पुणे-मिरज-कोल्हापूर
51455- पुणे-दौंड-सोलापूर
51435- पुणे-सातार
51451- पुणे-बारामती
51318- पुणे-कर्जत