जितेंद्र गोळे बावधन, दि. 11 -शालेय जीवनात स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमांत अभिनयाचे बाळकडू घेतलेल्या पेरिविंकल शाळेच्या माजी विद्यार्थ्याने थेट दाक्षिणात्य चित्रपटांत झेप घेतली आहे. प्रशांत बसवराज बेन्नी त्याचे नाव आहे.
प्रशांत हा बावधन बुद्रूक येथील पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूलचा माजी विद्यार्थी. साधारण 2001 मध्ये तो या शाळेत दाखल झाला. तेव्हापासून त्याची अभिनयाची धडपड आणि त्याचे कलागुण शिक्षकांना दिसून आले. मॉन्टेसरीपासूनच त्याने सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेऊन आपल्या कलेला वळण देण्यास सुरुवात केली. शाळेच्या दहा ते अकरा वर्षांच्या कालावधीत दहावीपर्यंत त्याला त्याच्या कलागुणांना पूर्णपणे वाव मिळाला, तो फक्त “पेरिविंकल’च्या सांस्कृतिक प्रांगणातच. प्रशांतचे वडील बसवराज बेन्नी हे व्यावसायिक. त्यानिमित्ताने ते भूगाव येथे वास्तव्यास आले. त्यांनी प्रशांतला पेरिविंकल शाळेत दाखल केले. तेथून त्याने शालेय आणि अभिनयाचे शिक्षण घेतले आणि आज तो “सूर्या- दी पावर ऑफ लव्ह’ या चित्रपटात प्रमुख नायकाच्या भूमिकेत चमकताना दिसतोय.
याबाबत आपल्या भावना व्यक्त करताना, प्रशांत म्हणतोय… मला मिळालेली प्रसिद्धी व प्रमुख भूमिका यासाठी त्याच्या पालकांबरोबरच शाळेचा व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. शाळेतील स्नेहसंमेलनात शिक्षकांनी गुण ओळखून त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्याने आज मी या उंचीवर पोहचलो. – प्रशांत बेन्नी, अभिनेता
प्रशांतला नायकाच्या भूमिकेत बघताना नक्कीच पेरिविंकल शाळेच्या आम्हा सर्वांना अभिमान आहेच. त्याच्या पुढील वाटचालीसाठी पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सर्व स्टाफच्या वतीने शुभेच्छा.
– राजेंद्र बांदल, चेअरमन, पेरिविंकल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट्स