बेल्हे, (वार्ताहर) – कांदळी (ता. जुन्नर) येथे झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात मंगेश गुंजाळ या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमदार अतुल बेनके यांनी वनविभागीय अधिकार्यांशी चर्चा केली आणि वन विभागाच्या माध्यमातून मंगेशच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले.
या आवाहनानुसार वन विभागाच्या माध्यमातून मंगेशच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची मदत देण्याचे घोषित करण्यात आले. या पैकी 10 लाख रुपयांचा धनादेश नुकताच मंगेशच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.
कांदळी येथील सुतारठिके वस्ती येथे मोटारसायकलवरून जात असलेल्या मंगेश गुंजाळ या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. संतोष गुंजाळ व अक्षय महाले हे दोघेजण मंगेश याच्या पाठीमागून मोटारसायकलवर येत होते.
मंगेश याच्यावर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे दिसताच त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहुन पळ काढला या घटनेत मंगेश याच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. या तरुणाचा मंगळवारी (दि. 5) रात्री उपचरादरम्यान मृत्यू झाला होता.
मंगेशचे जाणे हे दुर्दैवी आहे. गुंजाळ कुटुंबाला या दुःखात आधार देणे सावरणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या आर्थिक मदतीच्या माध्यमातून गुंजाळ कुटुंबाला पुन्हा उभारी घेण्यासाठी मदत होईल व तसेच भविष्यात इतर काही गरज भासल्यास मी स्वतः या कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभा आहे. – अतुल बेनके, आमदार