भोर, (प्रतिनिधी) – गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा निश्चित करावा, तसेच हिर्डोशी येथील ३५ खातेदारांची वाटप प्रक्रिया त्वरित करावी यासह अनेक मागण्यांवर धरणग्रस्तांबाबतच्या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती भोर वेल्हे व मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी दिली.
पुणे येथील विधानभवनात भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी निरा देवघर व गुंजवणी चाफेट प्रकल्पाचे विभागीय आयुक्त दीपक पुलकुंडवार यांच्या समवेत पुनर्वसन व इतर कामांची आढावा बैठक पार पडली. यात हिर्डोशी येथील ३५ खातेदारांची वाटप प्रक्रिया प्रलंबित असून ती जलद करावी.
धामुणशी येथील थेट खरेदी प्रस्तावाबाबत निर्धार व समितीची मान्यता मिळाल्यानंतर कार्यकारी अभियंता कृष्णा खोरे यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२४ अन्वये थेट खरेदी करता येणार नाही, असे अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ पुणे यांना कळविले.
माझेरी येथील अतिक्रमणाविषयी,हिर्डोशी- नांदळऐवजी बाडेरवाण येथे प्लॉट वाटप करणे किंवा दि. ८ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयाप्रमाणे आर्थिक पॅकेज देण्यात यावे. धामुणशी- मीरगाव ता. फलटण येथे प्लॉट वाटप केले होते. परंतु त्यांचे अंमल न दिल्याने दुबार वाटप झाले आहेत, ते रद्द करून २००० अर्ज केलेल्या वाटपाचा अंमल द्यावा.
धामुणशी येथील ज्ञानोबा धामुणसे व मधुकर मालुसरे यांची घरे पाडून झालेले नुकसान भरपाई मिळणे, एस एल ओ. ३ कडे निवाडा इतर दाखले, याबाबत मागणी केली असता प्रचंड विलंब होतो. त्याबाबत संबंधितांना समज देण्यात यावी. एस एल ओ ३ व १७ यांचे कडून संपादनाच्या रकमा वाटप झाल्या नाहीत, त्या त्वरित वाटप करण्यास मान्यता मिळावी, निरा देवघर प्रकल्पग्रस्तांना ज्या जमिनी वाटप केल्या आहेत.
परंतु त्यांची पावती करून दिली नाही याबाबत कामनिहाय कॅम्प करून पावती करून दयावी. १४ डिसेंबर २०२१ शासन निर्णय रद्द करण्याबाबत शासनाला अहवाल करण्यात यावा. जमीन वाटप करताना सर्व्हे कर करून जमीन वाटणी अहवाल मागवला जातो, तथापि एकच सर्वे कर असल्यामुळे ते ६-६ महिने तारीख देत नाहीत.
पूर्वीप्रमाणे तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागवून वाटप करावे. निरा देवघर धरण लाभ क्षेत्रातील जमिनी इतर प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात येऊ नये. गुंजवणी प्रकल्पाचा वाटप आराखडा निश्चित करावा, यासह अनेक बाबींवर या आढावा बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली, असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.