शासनाचा दिलासा : 5 शाळांचे वेतन अद्याप बाकी
पुणे – पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्चचे वेतन नुकतेच अदा करण्यात आले आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात गेल्या महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंदच ठेवल्या आहेत. त्यातच शासनाने आर्थिक अडचणी भासू लागल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मार्चच्या वेतनाची बिले शाळांना पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविला आहे.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक राजेंद्र साठे यांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन लवकर अदा करण्यासाठी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सतत वाटचाल केली. जिल्ह्यात एकूण 304 खासगी अनुदानित शाळा आहेत.
यात 2 हजार 544 शिक्षक व कर्मचारी कार्यरत आहेत. ऑनलाइन बिले आदा करणाऱ्या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे 20 टक्के अनुदानित शाळांना ऑफलाइन बिले वेतन पथकाकडे सादर करता आलेली नाहीत. त्यांची बिले सादर झाल्यानंतर त्यांच्याही वेतनाचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे.
मुख्याध्यापक सेवानिवृत्त होणे, मुख्याध्यापकाचे निधन, न्यायालयीन वाद या विविध कारणांमुळे 5 शाळांचे वेतन करण्यात आलेले नाही. वेतन पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही त्यांनी वेतन प्रकरणे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे, हे विशेषच आहे.
एप्रिलच्या वेतनाबाबत अद्याप शासनाकडून काहीच स्पष्ट आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे शासनाकडून आदेश आल्यानंतर शाळांना त्यानुसार वेतनाची बिले तयार करून पाठविण्याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी वेतन पथकाच्या कार्यालयाकडे येऊन गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये.
– राजेंद्र साठे, अधीक्षक, वेतन पथक