पुणे (प्रभात वृत्तसेवा) – चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई-पुणे-सातारा महामार्गावरून पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका हद्दीत येणाऱ्या जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 6 ते 9 या वेळेत जड वाहनांना पुढील 30 सप्टेंबरपर्यंत या मार्गावर येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ( eknath shinde chandani chowk pune )
पुढील आठवड्यापासून या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी (दि.26) चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा जबर फटका बसला. मुख्यमंत्र्यांनी या कोंडीतूनच थेट सचिवांना फोन करत तत्काळ ही कोंडी सोडविण्यासाठी उपययोजना करण्याच्या सूचना दिल्या आणि शनिवारी सकाळी सर्व अधिकारी चांदणी चौकात हजर झाले आणि पाहणी दौरा सुरू झाला. ( eknath shinde chandani chowk pune )
त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपविभागीय अधिकारी संजय आसवले यासह अधिकारी उपस्थित होते.
नव्या निर्णयानुसार मुंबई-पुणे-सातारा महामार्गावरील पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या हद्दीत अवजड वाहनांना बंदी करण्यात येणार आहे.
त्यामुळे ही सर्व वाहने हद्दीच्या बाहेर थांबविण्यात येणार असून, त्याबाबत सोमवारी (दि.29) आदेश काढण्यात येणार आहेत. तोपर्यंत सर्व वाहतूक संस्था आणि कंपन्यांना याची माहिती होईल. बंदी असलेल्या वेळेत सर्व अवजड वाहने वाहतुकीस अडथळा होणार नाहीत, अशा सुरक्षित ठिकाणी उभी करावीत अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. ( eknath shinde chandani chowk pune )
चांदणी चौकाबाबतचे काही ठळक निर्णय
– वाहतूक व्यवस्थापनासाठी 100 मार्शलची जादा तुकडी देणार. यात पिंपरी आणि पुण्यासाठी प्रत्येकी 50 जण
– महामार्ग आणि सेवा रस्त्यावरील खड्डे दोन विदवसांत बुजविण्यात येणार
– वेदभवन येथील वेदपाठशाळेजवळील जागा ताब्यात घेऊन रस्ता दुरूस्त करणार
– मुळशीकडून सातारकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात; सात दिवसांत पूल सुरू होणार
– जुना उड्डाणपूल येत्या पंधरा दिवसांत तोडण्यात येणार
– श्रृंगेरी मठ येथील जागा ताब्यात घेऊन सेवा रस्ता सुरू होणार