पुणे – लोणावळा-शिवाजीनगर-लोणावळा या दुपारच्या वेळेतील लोकल ट्रेन सेवेला आज (दि. 31) केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखविला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, मुंबई विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमरेंद्र सिंह, पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय इंजीनियर मनीष कुमार सिंह यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दि. 1 फेब्रुवारीपासून ही सेवा नियमीत सुरू होईल, असे पुणे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी ट्रेन क्रमांक 22157/22158 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-चेन्नई एग्मोर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई एक्स्प्रेसला लोणावळा येथे तसेच ट्रेन क्रमांक 11019/11020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मुंबई-शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या गाडीला कर्जत येथे थांबा देण्याचा शुभारंभ दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, शिवाजीनगर-लोणावळा-शिवाजीनगर ही लोकल क्रमांक 01592 शिवाजीनगर येथून 12.05 वाजता सुटेल आणि 13.20 वाजता लोणावळ्याला पोहोचेल आणि लोकल क्रमांक 01591 लोणावळ्याहून 11.30 वाजता सुटेल आणि शिवाजीनगरला 12.45 वाजता पोहोचेल.