कोपरगाव – महिला बचतगटांना मदतीचा हात देवून नेहमीच बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी तत्पर असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव मतदार संघातील बहादरपूरला महिला बचत गट भवन मंजूर करण्यात आले आहे.
कोपरगाव मतदारसंघात महिला बचत गटाचे मोठे जाळे निर्माण करून बचत गटाच्या महिलांचा आर्थिक उत्कर्ष साधण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. दरवर्षी गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन त्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या बचत गटांना स्थायी स्वरूपाचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी बचत गट भवन इमारत मिळविण्यासाठी बहादरपुरचे ग्रामपंचायतीने बचतगट भवनसाठी प्रस्ताव पाठविला होता.त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे बहादरपुरला बचतगट भवन मिळाले आहे.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत या बचतगट भवन इमारतीसाठी १० लाख रुपये निधी देण्यात आला असून त्याबाबतचे शासनाचे अधिकृत पत्र नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते बहादरपूरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांना देण्यात आले आहे.बहादरपूर गावात एकूण १६ महिला बचतगट असून दुर्गा ग्रामसंघ देखील आहे. या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना सहकार्याचे पाठबळ देऊन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीचे कारभारी नेहमीच प्रयत्नशील राहतील, असे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार संदीपकुमार भोसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय भास्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता वर्षराज शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव बोरणारे, शंकरराव चव्हाण, बाजार समितीचे संचालक राजेंद्र निकोले, संजय शिंदे, पद्मविभूषण डॉ. शरदचंद्र पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, संजय आगवण, विवेक परजने, योगिराज देशमुख, किरण होन, गजानन मते, ज्ञानेश्वर गव्हाणे, रंगनाथ गव्हाणे, गोपीनाथ रहाणे, सिकंदरभाई इनामदार, कौसरभाई सय्यद, युवराज गांगवे, शिवाजीराव शेळके, राजेंद्र खिलारी, त्र्यंबक परजणे, शरद होन, विलास चव्हाण आदींसह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, तलाठी व नागरिक उपस्थित होते.