पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बुधवारी (दि.21) झालेल्या अंतिम वर्ष परीक्षा सुरळीत झाल्या. या दिवशी एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचा दावा विद्यापीठाने केला.
दररोज काहींना काही तांत्रिक व इतर अडचणी परीक्षांमध्ये येत आहेत. यातून मार्ग काढत परीक्षा सुरुच ठेवल्या आहेत. काही विषयांच्या वेळापत्रकात बदलही करावा लागला. काही विषयांच्या परीक्षा उशिरा सुरु झाल्याने त्या रात्री उशिरापर्यंत सुरु होत्या.
बुधवारी झालेल्या ऑनलाइन परीक्षेसाठी 1 लाख 6 हजार 799, तर ऑफलाइनसाठी 20 हजार 383 विद्यार्थी अपेक्षित होते. त्यापैकी 1 लाख 6 हजार 210 जणांनी ऑनलाइन परीक्षा दिली. तसेच 18 हजार 141 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन दिली.
ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांबाबत योग्य ते नियोजन करून सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे कोणाकडूनही विद्यापीठाकडे तक्रारीचा फोन खणखणला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.