नवी दिल्ली – करोनामुळे गंभीर वातावरण आहे. थोडा ताप अथवा खोकला आला तरी घाबरायला होते. विशेष म्हणजे फ्लूचीही हीच लक्षणे असतात. त्यामुळे काहीवेळा निष्काळजीपणा केला जातो किंवा फारच काळजी केली जाते. मात्र, तज्ज्ञांनी आता करोना झाला की नाही हे ओळखण्यासाठी या लक्षणांचा क्रमच जाहीर केला आहे.
अर्थात, करोनाची लागण झाली असेल तर या क्रमाने लक्षणे दिसतील. करोनाची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये दिसणाऱ्या लक्षणांचा एक ठराविक पॅटर्न असतो असे कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांचे म्हणणे आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार बाधित व्यक्तीला सगळ्यांत अगोदर ताप येतो. त्यानंतर खोकला आणि मांसपेशींचे दुखणे सुरू होते. त्यानंतर मळमळ अथवा उल्टी येत असल्यासारखे वाटते. पुढच्या टप्प्यात डायरियाची समस्याही उद्भवू शकते व सगळ्यांत शेवटी श्वास घेण्यास त्रास व्हायला लागतो.
या क्रमाने लक्षणे आली तरी वेळ न दवडता त्वरित तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले जावेत असे सांगण्यात आले आहे. तसेच फ्लूच्या लक्षणांचा क्रमही या तज्ज्ञांनी सांगितला आहे. त्यानुसार फ्लू झालेल्या व्यक्तीला अगोदर खोकला येतो व नंतर ताप भरतो. काही रुग्णांना कंबरदुखी, थंडी वाजणे आणि कोरडा खोकलाही येतो. लक्षणे जवळपास सारखीच असल्यामुळे गोंधळ उडण्याचा आणि भीती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एका क्लिनिकमध्येच विविध रुग्णांची तपासणी करून हा क्रम ठरवण्यात आला असल्याचे डॉ. ग्लॅटर यांचे म्हणणे आहे. एन्फ्युएंझाच्याही सुरुवातीच्या टप्प्यात अगोदर खोकला होतो. मात्र, करोनाची लागण असेल तर अगोदर ताप येतो असे त्यांनी नमूद केले.