पुणे – पीएमपीची मिडीबस आता दर 5 मिनिटांनी उपलब्ध असेल. शहरात एकूण 37 नवे मार्ग आखण्यात आले असून, जेथे आतापर्यंत “कनेक्टिव्हिटी’ नव्हती, अशा ठिकाणापर्यंत ही बस धावेल. अंतर्गत भागात सेवा दिल्याने प्रवाशांची गैरसोय टळेल. यासाठी 5 किलोमीटरसाठी अवघे 5 रुपये तिकीट आकारले जाईल, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी बुधवारी दिली.
“अटल प्रवासी योजने’बाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.
जगताप म्हणाले, “मिडीबसमुळे उत्पन्न वाढीस मदत होईल, तसेच शहरातील कनेक्टिव्हिटीही सुधारेल. प्रवाशांना अवघ्या 5 रुपयांत जाता येणार असून मोठ्या बसेसमुळे होणारी वाहतूक कोंडी मिडीबसमुळे टळू शकेल. तसेच मिडी बस शहराच्या मध्यवर्ती भागातून धावणार असल्याने दुचाकी घरी ठेवून नागरिक सहकुटुंब मिडीबसने प्रवास करण्यास पसंती देतील.
येत्या दसऱ्यापासून (दि.25) ही सेवा सुरू होणार असून शनिवारी (दि. 24) शनिवारवाडा येथे या योजनेचे उद्घाटन होईल, असेही जगताप म्हणाले.