पिंपरी – भारतीय राज्यघटनेचा वापर गणपती बसविण्यासाठी करणारे दिग्दर्शक प्रवीण तरडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दखल करावा, अशी मागणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला यबाबतचे निवेदन दिले आहे.
भारतीय राज्यघटना ही स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वावर आधारित आहे. गणेशभक्तांच्या भावना लक्षात घेऊन, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरडे यांनी प्रसिद्धी मिळविण्याकरिता पुस्तकांचा बाप्पा बसविण्याच्या नावाखाली राज्यघटनेच्या प्रतिवर गणरायाची मूर्ती बसवून राज्यघटनेचा अवमान केला आहे. यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.
संविधानाला कमी लेखणे हा राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे तरडेंवर संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, सतीश काळे, गणेश दहिभाते, प्रमोदसिंह गोतारणे, विशाल जरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.