वडगाव मावळ,(प्रतिनिधी) – घराच्या अंगणात खेळत असताना रविवारी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी श्री. पोटोबा महाराज मंदिराजवळील तळ्यात आढळून आला. ऐतिहासिक तळ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वडगाव नगरपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून होत आहे.
समर बाळू कराळे (वय ८, रा. वडगाव मावळ) असे मृत बालकाचे नाव आहे. समर हा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असताना बेपत्ता झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला.
मात्र, तो सापडला नव्हता. त्यामुळे, त्याची आजी सुनीता दत्तात्रेय सुपेकर यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तळ्यात आढळून आला. समर हा वडगाव येथे त्याच्या आजी आजोबांकडे रहात होता. तो येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता.
वडगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री. पोटोबा मंदिरा शेजारी ऐतिहासिक तळे असून सध्या संरक्षक भिंतीची पडझड झाली असून त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या तळ्याच्या काठीच आठवडा बाजार भरतो. मंदिराच्या प्रांगणात अनेक लहान मुले खेळतात.
त्यामुळे संरक्षक भिंतीची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज आहे. येथे येणाऱ्या व्यावसायिकांकडून नगरपंचायत कर वसूल करते. मग तळ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी केली आहे.