मुळशी, दि. 8 (प्रतिनिधी) -पौड येथे मुळशी तहसिलदार नवीन कार्यालयाचे भूमिपूजन नुकतेच आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु, या कामाचे श्रेय घेण्यावरून आता वादविवादाला तोंड फुटले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सोशल मीडियावर “लढाई’ सुरू झाली आहे. यात दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मात्र मौन धरले आहे. तर, मधल्या आणि खालच्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते सोशल मीडियावर भिडत आहेत. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे सोमवारी (दि.10) मुळशी दौऱ्यावर असल्याने ते याबाबत काय भूमिका घेतात? याकडे मुळशीकरांचे लक्ष लागले आहे.
पौड येथे 14 कोटी 99 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असललेल्या मुळशी तहसिलदार कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते पार पडल्यानंतर याच्या श्रेयवादाला तोंड फुटले आहे. पौड येथील तहसिलदार कार्यालयाची इमारत प्रशस्त व अद्ययावत व्हावी, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून मुळशीकरांकडून होत होती. यासाठी काही दिवसांपूर्वी निधीची तरतूदही झाली. परंतु, सत्ता बदलामुळे तसेच विविध कारणांमुळे भुमिपूजन होत नव्हते.
सध्याच्या तहसिलदार कार्यालयामागील जागेत बांधकाम करायचे ठरले होते. मात्र, पौड येथे मागील महिन्यात आमदार संग्राम थोपटे यांची मुळशी समन्वयक समितीची बैठक झाली. बैठकीनंतर आमदार थोपटे यांनी नारळ फोडत या इमारतीचे भूमिपूजन केले. यावेळी शासकीय अधिकारी आणि तालुका कॉंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, आमदार थोपटे यांनी भूमिपूजन केल्यानंतर काही क्षणातच सोशल मीडियावर या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून मेसेजची शाब्दिक लढाई सुरू झाली. सोशल मीडियावरील विवाद बराच वेळ सुरू होता. यात कॉंग्रेसच्या एका युवक नेतृत्वाने समोरासमोर बसून चर्चा करण्याचेही आव्हान दिले.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांचा नकार…
पौड येथे मुळशी तहसिल कार्यालय भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम बांधकाम विभागाचा होता असले म्हटले जात आहे, या कार्यक्रमाबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही माहिती नव्हती. त्यामुळे मुळशी बांधकाम उपअभियंता नकुल रणसिंग यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. माहिती हवी असल्यास रितसर अर्ज करावा, लेखी माहिती देतो, असे सांगून त्यांनी नकार दिला.
आमदार संग्राम थोपटे यांनी मुळशी तहसिल नवीन कार्यालयाचे भूमिपूजन केले. आमदार थोपटे यांनी जरी हा निधी आणला असला तरी, त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीवरून हा निधी मंजूर केला आहे. तसेच, मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार संग्राम थोपटे यांचे काम केल्याने त्यांचा विधानसभेत विजय झाला होता.
– महादेव कोंढरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस मुळशी तालुकामहसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण असताना आमदार संग्राम थोपटे यांनी या कामासाठी निधीची मान्यता मिळवली. याबाबत कोणीही श्रेय घेऊ नये. मुळशी तहसिल नवीन कार्यालय भूमिपूजन कार्यक्रम पक्षाचा नव्हता तर बांधकाम विभागाने आयोजित केला होता.
– गंगाराम मातेरे, तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस