तगादा लावल्याने बढतीला “ब्रेक’ लागण्याची शक्यता
पुणे – पीएमपीच्या सहायक डेपो मॅनेजर पदासाठी खात्याअंतर्गत पदभरती लांबण्याची शक्यता आहे. 11 जागांसाठी 100पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. मात्र, अनेकांनी “माननीय’ व्यक्तींकडे धाव घेतली आहे. तर, काहींनी वरिष्ठांकडे तगादा लावला आहे. यामुळे बढती प्रक्रियेला “ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे काम सुरू आहे. सरळसेवेने खात्याअंतर्गत 11 सहायक डेपो मॅनेजर पदासाठी प्रशासनाने जानेवारीच्या सुरुवातीला जाहिरात काढली. निवडीसाठी समितीदेखील नेमण्यात आली. या जागांसाठी शंभरपेक्षा अधिक अर्ज आले. मात्र, महिनाभरानंतरही भरती प्रक्रिया “जैसे थे’ आहे. काही आशावादी कर्मचाऱ्यांनी माननीयांकडे धाव घेतली असल्याची चर्चा आहे.
…”या’ विभागातील कर्मचाऱ्यांची मोर्चेबांधणी
सहायक डेपो मॅनेजरपदासाठी अनेक अटी व शर्ती आहेत. तरीदेखील निवड समितीचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा उंचावल्याने त्यांनी खासगी बस समन्वय विभाग, जाहिरात विभाग यासाठी काही कर्मचाऱ्यांकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. यामध्ये एका पदाधिकाऱ्याच्या जवळ असणाऱ्या आणि कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्याकडून साथ दिली जात असल्याने कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.