बाकू :- नॉर्वेचा ग्रॅंडमास्टर मॅग्नस कार्लसन व भारताचा अवघा 18 वर्षीय बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद (Praggnanandhaa and Magnus Carlsen) यांच्यात येथे सुरू असलेल्या फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम फेरीतील दुसरा गेमही बरोबरीतच सुटला. आता गुरुवारी (दि.२४)या दोन खेळाडूंमध्ये टायब्रेकर रंगणार असून, त्यातूनच नवा विश्वविजेता निश्चित होणार आहे.
मंगळवारी या दोन खेळाडूंमधील पहिला गेम बरोबरीत सुटल्यावर बुधवारी क्लासिकल गटाच्या दुसऱ्या गेमकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले होते. पांढरी मोहरी घेत कार्लसनने सुरुवात केल्यावर त्याचेच वर्चस्व राहील असे वाटत होते. मात्र, प्रज्ञानंदने त्याला कडवी लढत देत बरोबरीवरच समाधान मानावे लागले. प्रज्ञानंदने कार्लसनविरुद्ध अफलातून कामगिरी केली. पाच वेळचा जागतिक विजेता असलेल्या कार्लसनला तब्बल 35 चालीनंतर बरोबरीवर समाधान मानले.
टायब्रेकरचा नियम?
या लढतीत दोन्ही गेम बरोबरीत सुटले असल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात येणार आहे. टायब्रेकरमध्ये प्रत्येकी 25 मिनिटांचे दोन गेम खेळले जातील. यातही निर्णय न लागल्यास प्रत्येकी 10 मिनिटांच्या दोन चाली दिल्या जाणार आहेत. त्यातही निर्णय न झाल्यास पाच मिनिटांचा खेळ खेळवला जाईल आणि अखेर तीन मिनिटांचा खेळ होईल.
प्रज्ञानंदचा बचाव अविश्वसनीय..
बचाव हीच प्रज्ञानंदची सर्वात मोठी ताकद आहे. या संपूर्ण स्पर्धेत त्याने जगभरातील खेळाडूंना याच बचावाच्या जोरावर जेरीस आणले. म्हणूनच तो क्लासिकल पद्धतीपेक्षा जलद तसेच ब्लिट्झमध्ये माहीर मानला जातो. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने 1790 गेममध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह 476 गेम जिंकले असून काळ्या मोहऱ्यांसह खेळताना 418 वेळा विजय प्राप्त केला आहे.