नवी दिल्ली – मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्या जवळ वाहनात स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शर्मा याच्यावर मनसुख हिरण हत्या प्रकरणाचाही गुन्हा दाखल आहे.
न्यायमूर्ती एएस बोपण्णा आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने त्यांना जामीन दिला आहे. या आधी मुंबई उच्च न्यायालयाने शर्माचा जामीन अर्ज फेटाळला होता. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना त्यांच्या आजारी पत्नीला भेटण्यासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.शर्माला जून 2021 मध्ये या प्रकरणात अटक करण्यात आली होती आणि ते तेव्हापासून न्यायालयीन कोठडीत होते.
25 फेब्रुवारी 2021 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील’अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एक एसयुव्ही गाडी सापडली होती.ही गाडी मनसुख हिरण यांच्या ताब्यात होती. त्यांचाहीं मृतदेह काही दिवसांनी ठाण्याच्या खाडीत सापडला होता. सचिन वाजे यांच्याशी संगनमत करून प्रदीप शर्माने मनसुख हिरण यांची हत्या केल्याचा आरोप आहे.
प्रदीप शर्मा हे एन्काऊंट स्पेशलिस्ट अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांचा समावेश असलेल्या मुंबई पोलिस दलाच्या पथकाने तीनशेहून अधिक गुन्हेगारांचा एन्काऊंटर मध्ये खात्मा केला आहे.