बुध -अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर गारवडी (ता. खटाव) येथे नववधू- वरासह मेहुण्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गारवडीकरांची झोप उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील “हाय रिस्क’मधील 31 जणांना पुसेगाव येथील कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे. तर दाम्पत्याला त्रास झाल्यावर बुधमध्ये दोन दिवस दोन खासगी दवाखान्यात उपचार घेऊन गेल्यामुळे बुधकरांना धडकी भरली आहे.
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गारवडी हे 1445 लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. येथ दि. 29 जुन रोजी लग्न झाले. कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथील नववधू होती. तर गारवडीमधील नवरदेव होता. नववधू 1 जुलै रोजी माहेरी पिंपोडे येथे गेली होती. नंतर ती गारवडीला आली.
या दाम्पत्याला व मेहुण्याला त्रास होऊ लागल्यामुळे दि.23 व 24 जुलै रोजी बुध येथील दोन खासगी दवाखान्यात त्यांनी उपचार घेतले. त्यानंतर त्यांनी फलटण येथील दवाखान्यात तिघांच्या स्त्रावाच नमुने घेऊन त्यांना जाधववाडी येथील करोना सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री उशिरा तिघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण गावात शांतता पसरली. रात्रीत प्रशासकीय यंत्रणा गतिमान झाली.
गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय आधिकारी डॉ. युनुस शेख, सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पवार, तलाठी अमोल जाधव, ग्रामसेवक संतोष माळवे, पोलीस पाटील ज्योती कदम, सरपंच शिवाजी शेडगे यांनी गावात भेट देऊन गाव संपूर्णपणे सील केले.
त्यांच्या कुटुंबातील “हाय रिस्क’मधील 31 जणांना पुसेगाव कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले. आज सकाळी डिस्कळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा यांनी घरोघरी सर्व्हे केला. गावाच्या सीमा लॉक करण्यात आल्या आहेत. किराणा दुकाने, दुध डेअरी बंद ठेवण्यात आल्या आहेत.