मुख्यमंत्री येताच वाढला रिकव्हरी रेट
पुणे – शहरातील करोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्रीच पुण्यात येणार असल्याची कुणकुण लागल्याने महापालिका प्रशासनाने अखेर करोना रुग्णांच्या आकडेवारीतील गोंधळ दूर केला आहे.
त्यामुळे पालिकेने मुख्यमंत्री शहरात येण्याच्या एक दिवस आधीच खासगी रुग्णालयांनी घरी विलगीकरणात ठेवलेल्या आणि दहा दिवस पूर्ण झालेल्या 1700 हून अधिक रुग्णांचा शोध घेऊन घरी बरे झालेल्या रुग्णांमध्ये हा आकडा दाखविला आहे. त्यामुळे शहराचा रिकव्हरी रेट अचानक वाढला आहे. मात्र, त्याचवेळी करोनाचे गंभीर रूपही समोर आले असून सध्या 29 जुलै अखेरपर्यंत उपचार सुरू असलेल्या 17 हजार 861 रुग्णांपैकी 18 टक्के ( 3 हजार 137) गंभीर रुग्ण आहेत. त्यांना ऑक्सिजनवर ठेवले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर, 28 जुलैपर्यंत ऑक्सिजनवर ठेवलेल्या रुग्णांची संख्या महापालिकेकडून 742 दाखवली होती. त्यामुळे आकडेवारीतील गोंधळ दूर होताच, 2375 ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची माहिती समोर आली आहे.
शहरात करोनाचा पहिला बाधित 9 मार्च रोजी सापडला. त्यानंतर महापालिकेकडून गेली चार महिने सातत्याने करोना नियंत्रणाचे काम सुरू आहे. मात्र, जून महिन्यात शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली असून दररोज उपचाराचे, घरीच विलगीकरणाचे निर्णय घेण्यासह सक्रिय बाधितांचा आकडा वाढत असल्याने पालिकेस आकडेवारीच अपडेट करता येत नसल्याचे चित्र आहे. त्यात, खासगी हॉस्पिटल तसेच लॅबकडूनही चाचण्या तसेच रुग्णांची माहिती लपवून ठेवण्यात येत असल्याने नेमके रुग्ण किती असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
त्यातच, मुख्यमंत्री पुण्यात करोना आढावा घेण्याचे लक्षात येताच पालिकेकडून मागील आठवड्यापासून ही आकडेवारीची चूक निस्तरण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमला. त्यांनी केलेल्या माहितीच्या तपासणीत खासगी हॉस्पिटलने मागील 14 दिवसांत घरी विलगीकरणात ठेवलेल्या रुग्णांचा कालावधी संपला असला तरी त्यांची नोंदच पालिका दरबारी झाली नसल्याने हे रुग्ण सक्रिय बाधितच असल्याचे दिसत होते. अशा सुमारे 1700 रुग्णांची नावे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी पालिकेकडून बरे झालेल्या रुग्णांच्या नोंदीत घेण्यात आली. त्यामुळे बुधवारी घरी सोडलेल्या रुग्णांचा आकडा थेट 2500 च्यावर गेला. परिणामी बरे झालेल्या रुग्णांचा आकडा वाढल्याने शहरातील रिकव्हरी रेट वाढविण्याची तसदी घेण्यात आली.