2017 मध्ये तामिळमध्ये हिट झालेल्या “आरुवी’ च्या हिंदी रिमेकमध्ये फातिमा सना शेख काम करणार आहे. या संदर्भातील बातमी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. या हिंदी रिमेकचे शिर्षक अद्याप ठरलेले नाही. मात्र या वर्षाच्या मध्यापासून त्याचे शुटिंग सुरू होणार आहे. तमिळमधील प्रख्यात दिग्दर्शक ई श्रीनिवास हे या हिंदी रिमेकचे डायरेक्शन करणार आहेत.
ई.श्रीनिवास यांनी दिग्दर्शित केलेल्या 1999 सालच्या “शूल’ला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या सिनेमात फातिमाला एक जबरद्स्त आक्रमक आणि आत्मविश्वासाने भारलेल्या हिरोईनचा रोल करायचा आहे. तमिळमध्ये हाच रोल आदिती बालनने केला होता आणि तिच्या रोलला खूप लोकप्रियताही मिळाली होती.
अगदी परंपरागत धाटणीच्या कथानकाला फाटा देणारे हे कथानक सर्वांनाच आवडले होते. ब्लॅक कॉमेडी आणि त्याला थ्रिलरचा तडका हे जबरदस्त कॉम्बिनेशन एकदम हटके असल्यानेच त्याचा हिंदी रिमेक करायचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. 2017 मध्ये रिलीज झालेल्या “आरुवी’ने बॉक्स ऑफिसवर यश तर मिळवलेच. पण कित्येक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाला गौरवले देखील गेले होते. सामाजिक बहिष्काराला तोंड देणाऱ्या एका युवतीची ही कथा आहे.