देहुरोड – “करोना’च्या भीतीपोटी पत्नीने चिकन, मासे घरी कशाला आणले, अशी विचारणा केली म्हणून पती-पत्नीत वाद झाले. यातून दारूच्या नशेतील पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. आईला मारहाण करणाऱ्या वडिलांवर 19 वर्षीय मुलाने दांडक्याने प्रहार केल्याने वडिलांचा मृत्यू झाला.
देहूगावातील विठ्ठलवाडी येथे रविवारी (दि. 16) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी रात्री उशिरा मुलास अटक केली आहे. संतोष विठ्ठल येळवंडे (वय 45, विठ्ठलवाडी, देहूगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी संतोष येळवंडे यांचा मुलगा विराज (वय 19) याला अटक करण्यात आली आहे.
रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संतोष येळवंडे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यावेळी करोना आजाराच्या भीतीपोटी पत्नी कविता यांनी “नॉनव्हेज’ घरी कशाला आणले, यातनू वाद होत संतोष यांनी कविता यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी विराज भांडण सोडविण्यासाठी गेला. त्यात वडील संतोष व विराज यांच्यातही झटापट झाली. यात विराजने रागात बाजूला पडलेले लाकडाचे दांडके वडिलांच्या डोक्यात मारले. संतोष यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी रात्री घटनास्थळी पंचनामा करून विराज याला अटक केली.