पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वर्चस्व वादातून टोळक्याने अल्पवयीन मुलावर खुनी हल्ल्याचा कट रचला. मात्र, तो मुलगा टोळक्याच्या तावडीतून सुटला. पण, टोळक्याने त्याच्या मित्राचा खून केला. ही घटना शुक्रवारी रात्री डहाणूकर कॉलनी येथे घडली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
श्रीनु शंकर विसलवात (२२, रा. डहाणूकर कॉलनी ) असे मृताचे नाव आहे. फिर्यादी १७ वर्षे ११ महिन्यांचा मुलगा आहे. तर मृत हा त्याचा मित्र आहे. ते दोघेही इतर मित्रांसोबत रस्त्यावर उभे होते. यावेळी सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन येऊन मोपेडला धडक देत दोघांना पाडले.
यानंतर फिर्यादीवर कोयत्याने वार केला, त्याने तो चुकविला. मात्र, कोयत्याच्या दुसरा उलटा वार त्याच्या हातावर लागला. यानंतर फिर्यादीने पळ काढला. मात्र, श्रीनू हा टोळक्याच्या तावडीत सापडला. टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस निरीक्षक एम.एम.चव्हाण करत आहेत.