सोमाटणे, (वार्ताहर) – शिरगाव येथील शारदाश्रम आश्रम शाळेस रोटरी क्लब ऑफ निगडी चँरीटेबल ट्रस्टच्या वतीने कंटेनरमध्ये असलेले अनोखे ग्रंथालय नुकतेच भेट देण्यात आले. या ग्रंथालयाचे हस्तांतरण क्लबचे अध्यक्ष हरविंदर सिंग डुलत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे, सपना लालचंदानी, विलो कंपनीचे सिएसआर हेड सिंटेलकुमार कुलकर्णी, सुनील जोशी, गणेश भालेराव शाळेचे मुख्याध्यापक विंजय लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या ग्रंथालयात एक अभ्यासक्रमाचे सोफ्टवेअर असलेला मोठा टीव्ही देखील शाळेस भेट देण्यात आला. या ग्रंथालयात पाच हजार पुस्तके ठेवता येतील आणि २० विद्यार्थी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय हे ग्रंथालय कंटेनर मध्ये असल्याने ते इतरत्र हलवता येते. या ग्रंथालयाचा वापर करून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान वाढवले पाहिजे. जागतिक स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता या ग्रथालयामुळे निर्माण होईल.
रोटरी क्लब सारख्या संस्था आहेत म्हणून इतके अद्ययावत ग्रंथालय या शाळेस मिळाले आहे .मला खात्री आहे या शाळेतील विद्यार्थी याचा जास्तीत जास्त वापर करून आपले ज्ञान वाढवतील व ते ज्या परिस्थिती मधून आले आहेत ती बदल्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करतील. – प्रकाश देवळे, अध्यक्ष, शारदाश्रम आश्रम शाळा