पुणे – मुलीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या वडिलांना भरधाव कंटेनरने धडक दिली. यात सुरेश सखाराम गवळी (55, रा. रमाबाई आंबेडकरनगर, नाशिक रोड) यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे शिवाजीनगर येथील हर्डीकर रुग्णालयासमोर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले, की सुरेश गवळी हे नाशिक येथे शेती आणि रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या मुलीची सोमवारी पहाटे पोलीस भरतीची मैदानी चाचणी होती. त्यासाठी ते रविवारी रात्रीच पत्नीसह पुण्यात आले होते. पोलीस मुख्यालय परिसरातील पदपथावर त्यांनी रात्री मुक्काम केला.
पहाटे मैदानी चाचणी असल्यामुळे त्यांनी मुलीला मैदानावर सोडले. त्यानंतर ते चहासाठी बाहेर आले होते. तर पत्नी मुख्यालय परिसरातच होती. हर्डीकर रुग्णालयासमोर रस्ता ओलांडत असताना, भरधाव कंटेनरने गवळी यांना धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलीस कंटनेर चालकाचा शोध घेत आहेत.