पारगाव शिंगवे (पुणे) – शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे मळ्यामध्ये रात्रीच्या वेळी शिकारीचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाच्या रेस्क्यु पथकाने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने विहिरीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
शिंगवे गावच्या गाढवे मळा येथील शेतकरी भाऊ भिमाजी गाढवे यांच्या उसाच्या शेतात असलेल्या विहिरीत सोमवारी (दि. 13) पहाटे बिबट्या पडला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास प्रसाद शरद गाढवे आणि भरत भाऊसाहेब गाढवे हे शेतीला पाणी पुरवठा करणारे विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला.
पोलीस पाटील गणेश पंडित यांनी वन विभागाला याबाबत कळवले. वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यु टिम घटनास्थळी दाखल झाली. वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक एस. एस. दहातोंडे, वनकर्मचारी संपत भोर आणि बिबट्या रेस्क्यु टिम सदस्य मनोज तळेकर, विलास भोर, समीर गोरडे, स्थानिक ग्रामस्थांनी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढले.
हा एक वर्षाचा नर जातीचा बिबट्या आहे. बिबट्याच्या पायाला जखम झाली असून त्याला उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठवण्यात आले आहे.