नवी दिल्ली – कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज जोरदार राडा झाला. परदेशात भारताची बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी लावून धरली. तर, कॉग्रेसनेही गौतम अदानी यांचा मुद्या उपस्थित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार हंगामा केल्यामुळे संसदेची कारवाई उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसया टप्प्यास आजपासून सुरवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात राडा झाला. कॉग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये मोदी सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. याचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बघायला मिळाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारताचा अपमान केला. त्यांच्या वक्तव्याचा सभागृहातील सर्व सदस्यांनी निषेध करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राजनाथ सिंग यांच्या या विधाणामुळे कॉग्रेस पक्षाचे पित्त खवळले आणि त्यांनी हिंडेनबर्ग रिपोर्टचा उल्लेख करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपती गौतम अदानी यांच्याशी नाते जोडत चौकशीची मागणी करायला सुरवात केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात जोरदार हंगामा केला. राज्यसभेतही पियुष गोयल यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज आधी दोनपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संघावर केली होती टीका
राहुल गांधी यांनी लंडन दौऱ्यात भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे म्हटले होते. सभागृहात विरोधकांना बोलले जावू देत नाही. माईक बंद केले जातात. शिवाय, राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला होता. आरएसएस ही फॅसिस्ट संघटना असून भारतातील लोकशाही मोडण्यासाठी तयार झालेली गुप्त संघटना असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. लंडन येथील चॅथम हाऊस येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी हे भाष्य केले होते.