देहूरोड – देहूरोड परिसरात मुलगी आणि वडिलांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या चाळीस वर्षीय नराधम बापास देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. देहूरोड शिवाजीनगर झोपडपट्टीत ही घटना घडली.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. यामिनी अडबे यांना आपल्या पतीच्या दुष्कृत्याची माहिती मुलीच्या आईने दिली होती. डॉ. अडबे यांनी संबंधित महिलेला घेऊन देहूरोड पोलीस ठाणे गाठत या प्रकरणाची फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित मुलीवर काही महिन्यांपासून जन्मदात्या पित्याकडून अत्याचार सुरू होते. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्या नराधमाने दिली होती. मात्र वारंवार होणारे अत्याचार असह्य झाल्यामुळे मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला.
गेल्या काही महिन्यांपासून मुलीची आई बाहेर गेल्यानंतर मुलगी घरात एकटी असताना पित्याकडून हा प्रकार होत होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.