नाशिक – नाशिकमध्ये काही महिन्यांपासून अपघातांच्या घटनांत वाढ होत आहे. त्यातच नाशिक – दिंडोरी मार्गावर ढकांबे गावाजवळ आज बोलेरो आणि दुचाकी यांची जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात टायर फुटल्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Fatal accident in Nashik; Five people died in Bolero-bicycle collision)
याबाबत अधिक माहिती अशी की, आज (दि. 5) दुपारच्या सुमारास सप्तशृंगी गडावरून बोलेरो खाली येत होती. यावेळी भरधाव बोलेरोवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यातच बोलेरोचा टायर फुटल्याने गाडीने दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिल्याचे समजते.
या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुचाकीवरील 2, तर कारमधील 3 जण जागीच ठार झाले. तर 3 जण जखमी झाले. या जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळातच घटनास्थळी दिंडोरी पोलीस दाखल झाले. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी आणि बोलेरोचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
देवीचे दर्शन घेऊन येताना काळाचा घाला
पोलिसांच्या माहितीनुसार, बोलेरो जीपमधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतत होते. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये द्राक्ष व्यापारी रामकेश यादव, मुकेश यादव यांचा समावेश आहे.