शेतकऱ्याची लेक झाली प्राचार्या

तीएक शेतकऱ्याची लेक…, शेतात काम करताना, गुरे-ढोरे राखताना तिचा एकाच ध्यास असायचा… खूप खूप शिकायचं आणि इतरांनाही शिकवायचं… तिला शिक्षक व्हायचं होतं… त्यासाठी कितीही कष्ट करायची तिची तयारी होती… शेतात काम करून मिळालेल्या पैशांनी पुस्तके खरेदी करायची… पण शिकणे काही तिने सोडले नाही… तिने जणू “प्राचार्यपदाचे’ बीजच शेतात पेरले होते… तिच्या दृढ इच्छाशक्तीपुढे अखेर परिस्थितीही झुकली आणि शेतकऱ्याची ही ध्येयवेडी, जिद्दी लेक “प्राचार्य’ बनली… एंजल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शुभांगी मच्छिंद्र तरस यांची ही अनोखी चित्तरकथा प्रेरकच…
शुभांगीताईंचा जन्म खेड तालुक्‍यातील चिंबळी येथे 24 जुलै 1987 शेतकरी कुटूंबात झाला. घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे परगावी पायी चालत पूर्ण केले. मात्र, शिक्षक होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी त्यांना अतोनात कष्ट करावे लागले. अर्थात, या कष्टाचे योग्य फळ त्यांना मिळालेच.

शुभांगीताईंनी शालेय जीवनातच शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांना शिक्षण घेणे मुश्‍किल झाले होते. तरीही, त्यांनी माघार घेतलीच नाही. शालेय जीवनातील आठवणी सांगताना शुभांगीताई म्हणाल्या की, शाळेतील मुले शनिवार, रविवारी सुट्टी म्हटलं की, आनंदी व्हायचे. आम्हांला त्या दिवशी मात्र शेतात गुरांना सांभाळायला जावे लागत होते. दुसऱ्यांच्या शेतात जावून मजुरी केल्यावर मिळणाऱ्या पैशांतून पुस्तके खरेदी करता यायची. अशा परिस्थितीतही शिक्षण पूर्ण केले’. त्यानंतर त्यांनी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात 2004-05 साली बी.एड. पूर्ण केले. यासाठी त्यांच्या भावांनी काम करुन त्यांना मोलाची आर्थिक मदत केली. बीएड झाल्यावर सरकारी नोकरी न करता स्वत: काहीतरी करायचं ठरवल्याने त्यांनी सरकारी नोकरी नाकारली.

शुभांगीताईंचा लग्नाचा विषय घरात निघाला तेव्हा मुलगा गरिब घरातील असला तरी चालेल, मात्र तो सुशिक्षित असायला हवा, अशी अट त्यांनी ठेवली. यादरम्यान त्या चिंबळी फाटा येथील श्री स्वामी समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होत्या. त्याचवेळी त्यांना किवळे येथील मच्छिंद्र तरस यांनी बघितले. आणि शुभांगी यांच्या घरच्यांना लग्नासंदर्भात विचारले. मच्छिंद्र तरससुद्धा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शुभांगीताईंनी त्यांना लग्नासाठी होकार दिला.

लग्नानंतर त्यांनी आणि पती मच्छिंद्र यांनी मिळून आपल्या नवगृह शिक्षण प्रसारक मंडळ संचालित एंजल पब्लिक स्कूल येथे प्राचार्य पदाची धुरा आपल्या हातात घेतली. ही जबाबदारी सांभाळत असतांना अनेकवेळा त्यांना भुतकाळातील दिवस आठवायचे. आपणही गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावे, असा विचार मनात घोळू लागला. यासाठी त्यांनी दरवर्षी पाच मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली. त्याचबरोबर आपल्या संस्थेत ज्या महिलांचे शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टिचर ट्रेनिंग सेंटर सुरू केले.

आपले शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यावर लग्नानंतर शुभांगीताईंच्या सासऱ्यांनी त्यांच्याजवळ घरातील एखादी व्यक्ती तरी वकील व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. वास्तविक त्यांच्या सासऱ्यांची शुभांगीताईंचे पती मच्छिंद्र हेच वकील व्हावेत, अशी इच्छा होती. पण काही कारणास्तव ते पूर्ण होऊ शकले नाही. तेव्हा त्यांनी एल.एल.बीला प्रवेश घेत वकीलीचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या सासऱ्यांचे स्वप्न पूर्ण केले. शुभांगीताई आवर्जून सांगतात की, या सर्व प्रवासात पती मच्छिंद्र यांनी मोलाची साथ दिली. शुभांगीताई आज आपल्या एंजल पब्लिक स्कूल येथे प्राचार्य म्हणून यशस्वीरित्या काम बघत आहेत. भविष्यात प्रशासन सेवेत जाण्याची इच्छा असून, जिल्हाधिकारी म्हणून कार्य करायचा त्यांचा मानस आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.