प्रशासन, नागरिकांमधील मजबूत दुआ

– नगरसेविका आशा शेंडगे-धायगुडे

महानगरपालिका प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिक यांची सांगड घालण्याचे काम नगरसेवक करीत असतात. नागरिकांच्या समस्या प्रशासनाकडे मांडून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणारे नगरसेवक खरेतर या दोघांमधील महत्त्वाचा दुआ ठरतात. नगरसेवक जितका जास्त सजग, तितके त्याच्या प्रभागातील कामे पूर्णत्वास जातात. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील कासारवाडी प्रभागाच्या नगरसेविका आशा शेंडगे याचे उत्तम उदाहरण ठराव्यात. आपल्या प्रभागातील कामे तडीला नेण्यासाठी प्रसंगी प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आशाताईंबद्दल महापालिकेत एक आदरयुक्‍त दरारा निर्माण झाला आहे, तो यामुळेच.

आशाताई शेंडगे यांचा पिंड सामाजिक कार्यकर्त्याचा. ओळखीची माणसे असोत व अनोळखी, त्या सर्वांच्या अडचणी सोडवण्यासाठी धावून जात. सामाजिक कार्य करतात. या कामातील काही मर्यादा त्यांच्या लक्षात आल्या. नागरिकांच्या तसेच आपल्या परिसरातील लोकांच्या समस्या सोडवायच्या असतील, तर राजकारणात गेले पाहिजे, हा विचार त्यांना पटला. त्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या. प्रभागातील नागरिकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दिवस-रात्र त्या मेहनत घेऊ लागल्या. सन 2017 मध्ये आशाताई नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यापूर्वी त्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावायच्या. विविध कामांमधून त्यांनी नागरिकांची मोट बांधली. महिलांना एकत्र केले. त्यांना बचत गटाच्या माध्यमातून विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले. मुलींसाठी विविध उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्याचा फायदा त्यांना 2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत झाला.

प्रभाग क्रमांक 30 मधून त्या निवडून आल्या. प्रभागातील कामे करून नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा एवढी अपेक्षा बाळगून त्यांनी कामाला सुरुवात केली. निवडून आल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी दमदार कामाला सुरुवात केली. मे 2017 मध्ये प्रभागातील ड्रेनेज लाईन, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची पाहणी केली. अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांनी प्रभागातील या समस्या तातडीने सोडवल्या. त्यामुळे नागरिकांमधूनही त्यांचे कौतुक होऊ लागले. पावासाळ्यामध्ये प्रभागामध्ये सर्वात मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, त्याचे नियोजन त्या पूर्वीच करतात. कासारवाडी परिसरातील सर्व ड्रेनेज लाईन दुरुस्ती करण्याचे काम त्यांनी हाती घेतले. स्वतः उभे राहून त्यांनी प्रभागातील नाले स्वच्छ केले. त्यामुळे प्रभागाचा कायापालट होऊ लागला. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

त्यांच्या कामाची घोडदौड सुरूच होती. सप्टेंबर 2018 मध्ये कासारवाडी येथे विसर्जन घाट बांधण्याची नागरिकांची तीव्र इच्छा होती. कासारवाडी येथील महिपती सखाराम जवळकर घाटाची दुरवस्था झाली होती. कासारवाडी येथे विसर्जन घाट असावा अशी त्यांची इच्छा होती. स्मशानभूमीतून गणपती बाप्पा विसर्जनासाठी जात असल्यामुळे सर्वांनाच अतीव दुख व्हायचे. म्हणून आशाताईंनी कासारवाडी येथे भव्यदिव्य गणपती विसर्जन घाट उभारण्याचे नियोजन केले. त्यादिशेने ठामपणे पावले टाकली. अंदाजपत्रकाचे वर्गीकरण केले. त्वरित भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ केला. त्या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा व नियमित पाहणी करून त्यांनी ते काम पूर्ण करून घेतले. सप्टेंबर 2018 मध्ये या विसर्जन घाटाचे जनतेसाठी लोकार्पण करण्यात आले.

आशाताई या नेहमी प्रभागातील स्वच्छतेवर लक्ष देतात. त्या प्रभागामध्ये स्वच्छता मोहीम राबवितात. त्यामध्ये त्या स्वतः सहभागी होतात. लहान मुलांसाठी त्या प्रभागामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करतात. लहान मुलांमध्ये खेलाडू वृत्ती जोपासली पाहिजे. यासाठी त्या प्रयत्न करतात. विद्यार्थी व पालकांसाठी त्या मार्गदर्शन शिबीर आयोजित करतात. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, पेपर कसा सोडवावा याचे मार्गदर्शन त्या शिबिरात देतात. प्रभागातील शाळांमध्ये जाऊन वेळोवेळी पाहणी करतात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आशाताई सदैव तत्पर असतात. त्यासाठी त्या आरोग्य शिबिरे आयोजित करतात. त्यामध्ये नागरिकांची मोफत तपासणी केली जाते. गंभीर आजाराने बाधित नागरिकांवर उपचार केले जातात. नगरसेविका झाल्यानंतर त्यांनी विशेषतः प्रभागातील उद्यान, जलतरण तलाव यांच्या देखरेखीवर भर दिला. त्याची सुधारणा केली. नदी स्वच्छतेवर त्यांनी विशेष भर दिला आहे. पवना नदीमधील जलपर्णी काढण्यासाठी त्या विविध उपक्रम घेतात. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांच्या कामाबाबत समाधानी आहेत.

महापालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आशाताई भरपूर मेहनत घेतात. नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्या प्रयत्न करतात. श्रावणबाळ पेंशन योजना, संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांची माहिती त्या महिलांना देतात. त्या योजनेचे अर्ज भरून त्यांना लाभ कसा मिळेल, यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. हळदी-कुंकू समारंभातून त्यांनी महिलांना जोडले आहे.

महापालिकेमध्ये प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. प्रशासनाच्या माध्यमातून त्या विविध कामे तात्काळ करून घेतात. त्याचा फायदा प्रभागातील नागरिकांना होतो. घरसंसार सांभाळून त्यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. चुकीच्या गोष्टीला चूक आणि चांगल्या कामाला बरोबर म्हण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळेच शहरात त्यांना एक आदरयुक्‍त स्थान मिळाले आहे.

एक महिला असल्यामुळे घर आणि महापालिका अशी त्यांची कसरत चालू असते. मात्र, आपल्या कुटुंबाकडेही त्यांचे व्यवस्थित लक्ष असते. महिला जन्मतः मजबूत क्षमतेच्या असतात. त्यांनी घरासाठी भरपूर त्याग केलेला असतो, त्यांना कमजोर समजू नये, असे आशाताईंचे म्हणणे आहे. महिलांबद्दल त्या अभिमानाने म्हणतात,
हजारो फूल चाहिए एक माला
बनाने के लिए
हजारो दीपक चाहिए एक आरती
सजाने के लिए
हजारो बूंद चाहिए समंदर
बनाने के लिए
पर एक स्त्री अकेली ही काफी है,
घऱ को स्वर्ग बनाने के लिए!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.