-->

धक्कादायक : परीक्षेच्या प्रश्‍नात शेतकरी आंदोलकांना संबोधले “हिंसक वेडे’?

चेन्नईच्या प्रतिष्ठीत शाळेविरोधात देशभर संताप व्यक्त

चेन्नई – केंद्र अथवा राज्य सरकारच्या एखाद्या निर्णयाविरोधात आंदोलन करणे, आपला निषेध नोंदवणे अथवा नाराजी व्यक्त करणे हा भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना दिलेला एक घटनादत्त अधिकार असताना, चेन्नईमधील एका शाळेने दहावीच्या प्रश्‍नपत्रिकेत शेतकरी कायद्याविरोधातील आंदोलकांना “हिंसक वेडे’ असे संबोधल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

येथील डीएव्ही बॉईज स्कूलने दहावीच्या 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरिक्षेत इंग्रजी भाषा व साहित्य या विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत पत्रलेखनाचा एक प्रश्‍न दिला आहे. हा प्रश्‍न असा आहे…
प्रजासत्ताक दिनी राष्ट्रीय राजधानीत सुरू झालेल्या उग्र हिंसाचारामुळे शेतकऱ्यांच्या विषयी देशवासियांच्या मनामध्ये निषेध आणि घृणेची भावना निर्माण झाली. केंद्राच्या नव्या शेती कायद्याच्या निषेधकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्ता नष्ट केली. भरदिवसा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. तसेच राष्ट्रध्वजाच्या बरोबरीने दहशतवादी संघटनेचा झेंडा फडकावण्यात आला. म्हणून आपल्या शहरातील एका दैनिक वृत्तपत्राच्या संपादकाला एक असे पत्र लिहा, ज्यामध्ये अशा प्रकारच्या भयंकर, हिंसक क्रूर कृत्याचा निषेध व्यक्त केला जाईल. ज्यांना हे लक्षात येत नाही की वैयक्तिक गरजा आणि फायद्यापेक्षा देशाचे हित मोठे असते. या हिंसक वेड्या आंदोलकांनी केलेली कृत्ये म्हणजे गुन्हेच असून ही कृत्ये कोणत्याही कारणास्तव कधीही न्याय्य ठरू शकत नाही.

इतकेच नव्हे तर, या दहा मार्कांच्या प्रश्‍नात, अशा बाह्य उत्तेजनाखाली वागणाऱ्या अशा हिंसक वेड्यांना रोखण्यासाठी काही उपाय सुचवण्यास विद्यार्थ्यांना सांगितले आहे. प्रश्‍नपत्रिकेची एक प्रतिमा सोशल मीडियावर दुसऱ्या शाळेच्या एका शिक्षकाने शेअर केली होती आणि त्यात म्हटले होते की हे पेपर गोपाळपुरममधील डीएव्ही बॉईज सीनियर सेकंडरी स्कूलने सेट केले होते.

या घटनेमुळे सोशल मीडियावर आता चर्चेला उधाण आले असून अनेक वापरकर्त्यांनी असे निदर्शनास आणून दिले की केंद्र सरकारने पास केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दोन महिन्यांपासून निषेध नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांची निंदा करण्याचा शाळा प्रशासनाचा हेतू स्पष्टपणे दिसून आला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी असा प्रश्‍न आल्याचा दुजोरा दिला असून या शाळेविरोधात कारवाईची मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.