पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या 41 हजार पार झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर उपचार करण्यासाठी पालिकेच्या वतीने ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यात आले आहेत. यासाठी 77 लाख 40 हजार रुपये खर्च झाला आहे. मात्र हे सिलिंडर नेमके खरेदी केले कसे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली की ते थेट पद्धतीने खरेदी करण्यात आले, याबाबत प्रशासनामध्ये गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन सिलिंडरच्या खरेदीला कार्योत्तर मान्यता देण्यासाठी हा विषय आगामी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला आहे. कार्यपत्रिकेमध्ये नमूद केल्यानुसार, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालय व वायसीएम रुग्णालयासाठी वैद्यकीय विभागाकडील मागणीनुसार जंबो सिलिंडरची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी मेसर्स जीव्हीएस सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बारामती यांच्याकडून दरपत्राकामधील प्राप्त लघुत्तम दरानुसार पाचशे नग थेट पद्धतीने खरेदी केले आहेत. यामध्ये एकीकडे प्रशासनाने लघुत्तम मंजूर दराचा उल्लेख केला आहे.
तर दुसरीकडे थेट पद्धतीने खरेदी करण्याच्या कामी व त्यास येणाऱ्या खर्चास मंजुरी देण्याचा उल्लेख केला आहे. यासाठी तब्बल 77 लाख 40 हजार रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र या ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी थेट पद्धतीने केली आहे की निविदा प्रक्रिया राबवून याची स्पष्टता यामधून होत नाही.