पुणे : सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक आणि संगीतकार प्रभाकर जोग यांचे आज सकाळी पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. प्रभाकर जोग यांचे व्हायोलिन ’गाणारे व्हायोलिन’ म्हणून ओळखले जाते. त्यांनी या नावाने अनेक ठिकाणी कार्यक्रमही केले होते.
संगीतकार, संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक म्हणून तब्बल सहा दशकांहून जास्त वर्षे कार्यरत असलेल्या प्रभाकर जोग यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताबरोबरच भावसंगीतातही मोलाचे योगदान आहे.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी पुण्यात वाडय़ांमधून सव्वा रूपया आणि नारळाच्या बिदागीवर व्हायोलिन वादनाच्या कार्यक्रमांना सुरूवात केली. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक म्हणून काम केले. ‘गीतरामायणा’तील गाण्यांना प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनचे सूर लाभले आहेत. बाबुजींबरोबर गीतरामायणाच्या पाचशे कार्यक्रमांना त्यांनी साथ दिली.
जोग यांना या पुरस्काराने केले सन्मानित
* महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जाणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार (२०१५)
कैवारी, चांदणे शिंपीत जा आणि सतीची पुण्याई या चित्रपटांना दिलेल्या संगीताला ’सूरसिंगार पुरस्कार’
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार (जुलै २०१७)
* २०१७ सालचा गदिमा पुरस्कार
* पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे दिला जाणारा वसुंधरा पंडित पुरस्कार (२०१३)