प्रयागराज – उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये अनुसुचित जातीच्या एकाच कुटुंबातील चार जण मरण पावलेल्या आवस्थेत गुरूवारी रात्री आढळले. या चौघांची हत्या करण्याआधी त्यांच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. शेजारी राहणाऱ्या उच्च जातीच्या व्यक्तींनीच हे हत्याकांड घडवल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.
फूलचंद्र सरोज उर्फ फुले (वय 50), त्यांची पत्नी मीना देवी (45) आणि मुलगा शिव यांचे मृतदेह एका खोलीत सापडले. तर शेजारच्या खोलीत 16 वर्षांच्या सपनाचा मृतदेह बेडवर आढळला.
पोलिसांनी सामुहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा 11 जणांवर नोंदवला आहे. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने या हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्व शक्यता गृहीत धरून तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घराचे कुंपण ओलांडून समाजकंटक आत घुसले असावेत आणि झोपेत असतानाच या हत्या केल्या असाव्यात असा संशय आहे. पोलिसांना घटनास्थळाचे एक रक्ताचे डाग असणारी कुऱ्हाड सापडली आहे. त्यामुळे त्याचा वापर या हत्या करण्यासाठी केला असण्याची शक्यता आहे.