पुणे – अण्णा भाऊंच्या फकीरावरती भविष्यात चित्रपट निघाला तर मी सर्वतोपरी प्रयत्न करेन आणि या कलाकृतीसाठी एक रुपया देखील कमी पडणार नाही याची मी काळजी घेईन, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
“आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तेल वात समिती’ आणि पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्ताने “फकीरा’ आणि इतर पुरस्कार वितरण समारंभ सावित्रीबाई फुले स्मारक, गंज पेठ या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी सिने अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना “फकीरा पुरस्कार’, यशवंत नडगम यांना “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार’, “प्रतिभा नारी परिवर्तन संस्था’ यांना सामाजिक कार्याबद्दल गौरव समाज भूषण पुरस्कार पुण्याचे पालकमंत्री तसेच उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश बागवे, आयोजक सुखदेव अडागळे, नगरसेवक अविनाश बागवे, रवी पाटोळे, दयानंद अडागळे, सुशिला नेटके, अनुसया चव्हाण, राहुल खुडे, सचिन जोगदंड आणि समाजातील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक सुखदेव अडागळे यांनी प्रास्ताविक केले.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मी वाचले आहे. भविष्यात मला जर संधी मिळाली तर अण्णा भाऊंच्या फकीरावरती एक रुपया माझे मानधन न घेता दर्जेदार चित्रपट निर्मिती करेन, असे आश्वासन तरडे यांनी दिले. सूत्रसंचालन ऍड. महेश सकट यांनी केले, ऍड. श्रीराम कांबळे यांनी आभार मानले.