पिंपरी – कोकणातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. त्यासाठी गावी जाता यावे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील वल्लभनगर आगारातून खास एसटी बसची सुविधा करण्यात आली असून अगाऊ बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्तापर्यंत 40 बसचे बुकिंग फुल्ल झालेले आहे. तर, येत्या 17 सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना बुकिंग करता येणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यावसाय, उद्योगाच्या निमित्त नागरिक वास्तव्यास आहेत. सण, उत्सवानिमित्त ते आपापल्या गावी जात असतात. अशा वेळी एसटी महामंडळातर्फे या नागरिकांची सोय व्हावी, म्हणून आगाऊ एसटी बसची सुविधा पुरवली जाते. कोकणात गणेशोत्सवाला वेगळेच महत्व आहे. नोकरी-व्यवसाय, उद्योगानिमित्त कोठेही असले तरी, कोकणवासीय गणेशोत्सवाला आपल्या गावी जातात. येत्या 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त कोकणी बांधवांसाठी वल्लभनगर आगारातून खास त्यांच्यासाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आगाऊ बुकिंगही सुविधा उपलब्ध असून आगारातून 40 एसटी बस फुल्ल झालेल्या आहेत. तर, जसे बुकिंग येईल, त्यानुसार एसटी बस सोडण्यात येणार आहेत, असे आगारातून सांगण्यात आले. त्यामुळे गणेशोत्सवाला जाणाऱ्या कोकणी बांधवांची गैरसोय होणार नाही. कोकणात प्रामुख्याने चिपळून, गुहागर, खेड, रत्नागिरी, सावंतावाडी या ठिकाणी एसटी बसचे बुकिंग होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणी बांधवांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी एसटी बसचे बुकिंग सुरू असून अत्तापर्यंत 40 एसटी बसचे बुकिंग फुल्ल झालेले आहे. कोकणी बांधवांचा बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सवासाठी येत्या 16, 17, 18 सप्टेंबरला आगारातून कोकणसाठी या एसटी बस सोडण्यात येणार आहेत. कोकणी बांधवांसाठी ही सुविधा असून त्यांच्या सोयीसाठी येत्या 17 सप्टेंबरपर्यंत बुकिंगची सुविधा असणार आहे.
– संजय वाळवे, वल्लभनगर आगार प्रमुख.