पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची बनावट स्वाक्षरी असलेल्या बनावट आदेशाद्वारे हडपसरमधील वनविभागाची अठरा एकर जागा बळकावण्याचा प्रयत्न वन अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला.
तर, महसूल अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर खडक पोलिसांनी शनिवारी रात्री पोपट पांडुरंग शीतकल (रा. रामोशी आळी, हडपसर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात आरोपीच्या नावावर झालेल्या सात-बारा पुन्हा सरकारच्या नावावर वर्ग झाला.
हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोपट शीतकलने दगडू सीताराम चव्हाण, रामदास दगडू चव्हाण, ताई नंदलाल शीतकल, सिंधुताई पांडुरंग शीतकल, पोपट पांडुरंग शीतकल, अंकुश पांडुरंग शीतकल, कमल महादेव माकर, राकेश पांडुरंग शीतकल यांच्या नावे अधिकृत प्रतिनिधी म्हणून शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. पूर्वजांच्या नावे हडपसरमधील सर्व्हे क्रमांक 62 येथील वनक्षेत्रातील 18 एकर जागा शीतकल यांच्या नावावर करून देण्याची मागणी आरोपी पोपट शीतकल याने पत्राद्वारे महसूल विभागाकडे केली होती.
त्यावर संबंधित जागेबाबत शासनाने निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.
शीतकल यांनी याबाबत तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्यावेळी प्रकरणाची शहानिशा करून पाटील यांनी शीतकलचा दावा फेटाळला होता. त्यानंतर शीतकल याने पाटील यांची स्वाक्षरी असलेला बनावट आदेश हवेली तहसीलदारांकडे दिला होता. महसूल विभागाने कार्यवाही करून आरोपी शीतकल याच्या नावे जमिनीचा सात-बारा तयार केला.
दरम्यान, वनविभागाचे पुणे कार्यालयातील उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्याकडे हे प्रकरण आले. त्यांनी संबंधित 18 एकर जागा वनविभागाची असून ती हस्तांतरित करता येणार नसल्याचे तहसीलदार कोलते यांना कळवले. त्यानंतर महसूल विभागाने शीतकल याने केलेल्या अर्जाची पडताळणी केली. तेव्हा त्याने बनावट आदेश तयार केल्याचे निदर्शनास आले.