पुणे – कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा पुणे लोकसभेसाठी नेहमीच गेम चेंजर ठरला आहे. त्यामुळेच एकेकाळी काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला मागील दोन टर्मपासून भाजपच्या ताब्यात आहे. कोथरूडमध्ये पक्ष आणि उमेदवार याची पारख करूनच मतदान होते. त्यामुळे भाजपसाठी हा मतदारसंघ आता सत्ताकेंद्र बनत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात 1952 पासून काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. त्यामध्ये जनता पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांना एकदाच संधी मिळाली. मात्र, 1999 मध्ये काँग्रेसला शह देत भाजपने पुणे लोकसभेची जागा ताब्यात घेतली. त्यानंतर काँग्रेसने सुरेश कलमाडी यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि 2004 मध्ये गेलेला बालेकिल्ला पुन्हा काबीज केला.
मात्र, 2014 मध्ये काँग्रेसला उतरती कळा लागली आणि भाजपने अनिल शिरोळे जवळपास 3 लाख 15 हजार मतांच्या फराकाने विजयी झाले. 2019 मध्येही दिवंगत गिरीश बापट यांनी सर्वाधिक मते घेऊन 3 लाख 24 हजार मतांच्या फरकांनी विजय मिळविला.
या दोन्ही विजयामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा वाटा आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड, कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघांत 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले. त्यामध्ये गिरीश बापट यांना सर्वाधिक 1 लाखाहून अधिक मतदान करून कोथरूडकरांनी लीड दिले होते.
एवढचं नव्हे, तर विधानसभा निवडणुकीतही मागील दोन टर्मपासून भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील यांना कोथरूडकरांनी बहुमताने विजयी केले आहे. त्याआधी शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे यांना कोथरूडकरांनी पसंती दिली होती. त्या वेळी भाजप-शिवसेना युती होती. एकंदरीत कोथरूडकरांकडून लोकसभेत भाजपच्या उमेदवाराला साथ दिल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येते.
यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून कोथरूडमधूनच मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोथरूडकर त्यांना कशी साथ देणार, याबाबत उत्सुकता आहे. त्याबरोबर मोहोळ यांच्या विरोधात नुकतेच कसबा विधानसभेवर निवडून आलेले रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे धंगेकरांना कोथरूडकरांची मने जिंकता येणार का? हे मतपेटीतूनच समोर येईल.
बालेकिल्ल्यावर वर्चस्व कोणाचे?
1952 ते 1999 पर्यंत पुणे लोकसभेवर काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. 1999 मध्ये भाजपचे प्रदीप रावत यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला जिंकला. मात्र, हा विजय केवळ एक टर्म राहिला. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये पुन्हा काँग्रेसने विजय मिळविला. मात्र, मागील दोन टर्म 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे वर्चस्व आहे.
72 वर्षांत भाजपने पुणे लोकसभेवर विजय मिळविल्यानंतर एक किंवा जास्तीत जास्त दोन टर्म हा विजय टिकवून ठेवता आला. यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जनमतातील असून, एकीचे बळ, विकासाचे मुद्दे आणि मतदारांच्या मनाचा ठाव घेणारा उमेदवारच सर्वाधिक मते स्वत:कडे वळवू शकतो. त्यामुळे यंदा भाजप बालेकिल्ला टिकविणार, की पुन्हा काँग्रेसच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
पुणे लोकसभा निवडणूक 2024 एकूण मतदान
एकूण मतदान – 4 लाख 1 हजार 419
पुरूष मतदान – 2 लाख 10571
स्त्री – 1 लाख 90 हजार 828
इतर – 20
लोकसभेला कोथरूड विधानसभेचे मतदान
एकूण मतदान – 2 लाख 526
गिरीश बापट यांना मिळालेली मते – 1 लाख 48 हजा 570
मोहन जोशी यांना मिळालेली मते – 42 हजार 374
गिरीश बापट यांना मिळालेले लीड – 1 लाख 5 हजार 996
कोथरूड विधानसभा मतदारसंघात येणारा भाग
एरंडवणा, रामबाग काॅलनी, डीपी रोड, कर्वेनगर, हिंगणे होम काॅलनी, जुना जकातनाका, डहाणूकर काॅलनी, पटवर्धन बाग, गोसावी वस्ती, खिलारेवाडी, गोपिनाथनगर, सागर काॅलनी, शास्त्रीनगर, आनंदनगर, सुतारदरा, केळेवाडी, परमहंसनगर, वनाज, मोरे विद्यालय, कोथरूड गावठाण, मयूर काॅलनी, अलंकार पोलिस स्टेशन परिसर यांसह अन्य भाग.
कोथरूड पुणे भाजपचे सत्ताकेंद्र
भाजपाचे सत्ताकेंद्र हे शिवाजीनगर आणि कसबा विधानसभेमध्ये असल्याचे दिसून आले. मात्र, मागील वर्षभरात कसबा विधानसभा हातातून गेल्यावर कोथरूड विधानसभा हेच भाजपचे प्रमुख सत्ताकेंद्र बनले आहे. या मतदारसंघात एकूण पाच प्रभाग येतात. त्यामध्ये 20 नगरसेवकांपैकी 15 नगरसेवक हे भाजपचे आहेत. त्याचबरोबर कोथरूडमध्ये कॅबिनेट मंत्रिपद, नुकतेच राज्यसभा खासदारही कोथरूडमधील आणि आता पुणे शहराचे मुख्य कार्यालयही कोथरूडमध्येच आहे.
लोकसभेतील मतदान आकडेवारी
2019
गिरीश बापट – 6 लाख 32 हजार 835
मोहन जोशी – 3 लाख 8 हजार 207
2014
अनिल शिरोळे – 5 लाख 69 हजार 825
डाॅ. विश्वजित कदम – 2 लाख 54 हजार 56
2009
सुरेश कलमाडी – 2 लाख 79 हजार 973
अनिल शिरोळे – 2 लाख 54 हजार 272
2004
सुरेश कलमाडी – 3 लाख 73 हजार 774
प्रदीप रावत – 3 लाख 598
1999
प्रदीप रावत – 3 लाख 4 हजार 955
मोहन जोशी – 2 लाख 13 हजार 670