“निवडणुकीमध्ये चेहरा पाहिला जात नाही धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार”; मंडई विद्यापीठ कट्ट्यावर शिवसैनिकांची भूमिका

सहकार नगर – सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यक्ती किंवा चेहरा पाहिला जात नाही, तर धनुष्यबाण हाच शिवसेनेचा उमेदवार समजून शिवसैनिक काम करत आहेत आणि करतील. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचाच वरचष्मा राहील, असा विश्वास शिवसैनिकांनी मांडला.

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, कोरोना महामारीचे सावट संपले नाही, त्यामुळे घर हेपण एक मंदिरच हीच सामान्य नागरिकांची भावना आहे. गणेशोत्सवही त्याच पद्धतीने साजरा होईल. भाजप मंदिर उघडण्यास बाबत दुपट्टी पणाची भूमिका घेत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पुणेकर नागरिक सूज्ञ आहेत, त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हीजन २०२२ च्या अनुषंगाने संवाद सत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, शिवसेनेचे पालिका गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे, डॉ. अमोल देवळेकर, हर्षल मालुसरे उपस्थित होते. यावेळी कट्ट्यावर आलेल्या मान्यवरांचा सत्कार मंडई विद्यापीठ कट्टाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले.

गजानन थरकुडे म्हणाले की, युती सरकार असताना भाजपने शिवसेनेला सतत मागे खेचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुण्यात शिवसेनेचे कमी नगरसेवक निवडून आले. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला त्यांची खरी जागा दाखवून देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज सुतार म्हणाले की, पालिकेत शिवसेनाच्या पुढाकारामुळे कापडी पिशवी वाटपाचे पितळ उघडे केले. शिवसैनिक जात-पात धर्म पाहात नाही, तर व्यक्ती म्हणून सामान्यांच्या मदतीसाठी आघाडीवर आहे आणि पुढेही राहील, असे त्यांनी सांगितले.

रमेश कोंडे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द होता, धनुष्य बाण हाच शिवसेनेचा उमेदवार आहे. त्यामुळे आम्ही व्यक्ती पाहात नाही, धनुष्य बाणासाठी काम करत आहोत आणि भविष्यातही करत राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्याम देशपांडे म्हणाले की, येत्या गणेशोत्वामध्ये पुण्यातील सर्वच गणेश मंडळांचे कार्यकर्ते शासनाने घालून दिेलेल्या नियमांचे पालन करून चांगला आदर्श घालून देतील. कोणत्याही भूलथापालांना पळी पडणार नाहीत. सामान्य नागरिकांसाठी घर हेच मंदिर आहे. कोरोनाचे सावट संपल्यानंतर पुन्हा जल्लोषात उत्सव साजरा करता येतील, असा सल्लाही त्यांनी सामान्य नागरिकांना दिला.

डॉ. अमोल देवळेकर म्हणाले की, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कोविड-१९चे लसीकरण झाले आहे. मात्र, लहान मुलांना लस दिली गेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना व्हायरसपासून सावधानता बाळगण्याची गरज आहे. किरकोळ आजार जाणवला तरीसुद्धा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार करून घेणे सर्वांच्याच हिताचे आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर असली तरी सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची सर्वदूर ओळख आहे. ही ओळख जपण्याचे काम मंडई विद्यापीठ कट्टाच्या माध्यमातून बाळासाहेब मालुसरे करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.